SL vs IND 3rd ODI Live Match | कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वन डे सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. 'करा किंवा मरा'च्या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. यासह श्रीलंकेने २-० ने मालिका खिशात घातली. मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने अनिर्णित करण्यात यश मिळवले होते. मग दुसरा सामना जिंकून यजमानांनी आघाडी घेतली. बुधवारी झालेला अखेरचा सामना जिंकून श्रीलंकेने मालिका जिंकली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा वगळता एकाही फलंदाजाला या मालिकेत साजेशी खेळी करता आली नाही. रोहितने पहिल्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केली, तर अखेरच्या सामन्यात ३५ धावांचे योगदान दिले. सलग दुसऱ्या विजयासह श्रीलंकेने ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी १९९७ नंतर प्रथमच भारताविरूद्ध वन डे मालिका जिंकली आहे. श्रीलंकेच्या संघाने सांघिक खेळीच्या जोरावर विजय संपादन केला.
श्रीलंकेने दिलेल्या २४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १३८ धावांत सर्वबाद झाला. भारताने २६.१ षटकांत सर्वबाद अवघ्या १३८ धावा केल्या आणि ११० धावांनी सामना गमावला. भारताकडून रोहित शर्माने (३५), शुबमन गिल (६), विराट कोहली (२०), रिषभ पंत (६), श्रेयस अय्यर (८), अक्षर पटेल (२), रियान पराग (१५), शिवम दुबे (९), वॉशिंग्टन सुंदर (३०) आणि कुलदीप यादवने (६) धावा केल्या. श्रीलंकेकडून डुनिथ वेललेजने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर असिथा फर्नांडो (१), महेश तीक्ष्णा (२), जेफरी वांडरसने (२) बळी घेतले.
तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने सर्वाधिक ९६ धावांची खेळी केली. याशिवाय पथुम निसांका (४५), कुसल मेंडिस (५९), चरिथ असलंका (१०), सदीरा समरविक्रमा (०), जनिथ लियानगे (८), डुनिथ वेललेज (२), कामिंदू मेंडिस (नाबाद २३ धावा) आणि महेश तीक्ष्णा ३ धावा करून नाबाद परतला. यजमानांनी निर्धारित ५० षटकांत ७ बाद २४८ धावा केल्या. भारताकडून रियान परागने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानगे, कामिंदू मेंडिस, डुनिथ वेलालगे, महेश तीक्ष्णा, जेफरी वांडरस, असिथा फर्नांडो.