SL vs IND Live Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरचा ट्वेंटी-२० सामना बरोबरीत संपला. खरे तर श्रीलंका सहज सामना जिंकेल असे वाटत असताना भारतीय गोलंदाजांनी सामन्यात रंगत आणली. यजमानांना सामना जिंकण्यासाठी अखेरच्या षटकापर्यंत लढावे लागले. पण त्यांच्या हाती विजय लागला नाही. एकोणिसाव्या षटकात रिंकू सिंगने कमाल करत अवघ्या तीन धावा देऊन दोन बळी घेतले. भारताकडून रिंकू सिंग, रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाने प्रत्येकी २-२ बळी घेतले होते. त्यात कर्णधाराने भर टाकली. अखेरच्या षटकात सूर्याने दोन बळी घेतले.
अखेरच्या षटकांत ६ धावांची गरज असताना कर्णधार सूर्यकुमार यादव गोलंदाजाठी आला. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर त्याने दुसऱ्याच चेंडूवर कामिंदू मेंडिसला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्या पुढच्या चेंडूवर आणखी एक बळी घेण्यात भारतीय कर्णधाराला यश आले. शेवटच्या २ चेंडूत ५ धावांची श्रीलंकेला आवश्यकता होती. श्रीलंकेला या चेंडूवर २ धावा मिळाल्या. मात्र शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना त्यांनी दोन धावा काढल्या अन् सामना बरोबरीत संपला.
सूर्या-रिंकूची गोलंदाजीत कमाल
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना म्हणजे एखाद्या चित्रपटातील हास्यास्पद कथाच. अखेरच्या २ षटकांत अवघ्या ९ धावांची गरज असताना सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. एकोणिसाव्या षटकात रिंकू सिंगने ३ धावा देत २ बळी घेतले तर सूर्याने शेवटच्या षटकात केवळ ५ धावा देऊन दोन बळी घेण्याची किमया साधली. यामुळे यजमानांना लक्ष्य गाठता आले नाही. श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १३७ धावा करू शकल्याने सामना अनिर्णित संपला.
तत्पुर्वी, शुबमन गिल वगळता एकाही भारतीय शिलेदाराला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ३७ चेंडूत ३९ धावांची संयमी खेळी केली. अखेर भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १३७ धावा करू शकला. अखेरच्या काही षटकांमध्ये रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी साजेशी खेळी केल्याने सर्वबाद होण्याचा धोका मात्र टळला. भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक (३९) धावा केल्या, तर यशस्वी जैस्वाल (१०), संजू सॅमसन (०), रिंकू सिंग (१), सूर्यकुमार यादव (८), शिवम दुबे (१३), रियान पराग (१६), वॉशिंग्टन सुंदर (२५), रवी बिश्नोई (नाबाद ८) आणि मोहम्मद सिराज शून्यावर धावबाद झाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करताना महेश तीक्ष्णाने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर वानिंदू हसरंगा (२), चामिंदू विक्रमासिंघे, असिथा फर्नांडो आणि रमेश मेडिंस यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.