SL vs IND 3rd T20 Match Live Updates : भारताने दिलेल्या १३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करून यजमान श्रीलंका सहज सामना जिंकेल असे अपेक्षित होते. मात्र, श्रीलंकेच्या डावातील अखेरच्या काही षटकांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी दोन षटकांत चार बळी घेत सामना फिरवला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना म्हणजे एखाद्या चित्रपटातील हास्यास्पद कथाच म्हणावी लागेल. अखेरच्या २ षटकांत अवघ्या ९ धावांची गरज असताना सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. एकोणिसाव्या षटकात रिंकू सिंगने ३ धावा देत २ बळी घेतले तर सूर्याने शेवटच्या षटकात केवळ ५ धावा देऊन २ बळी घेण्याची किमया साधली. यामुळे यजमानांना लक्ष्य गाठता आले नाही. श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १३७ धावा करू शकल्याने सामना अनिर्णित संपला. मग सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवून ३-० ने मालिका जिंकली. पल्लेकले येथील आंतरराष्ट्रीय मैदानात अखेरचा सामना झाला.
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने दोन गडी गमावून अवघ्या २ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सुपर ओव्हर टाकली. तीन चेंडूत २ धावा देऊन त्याने २ बळी घेतले. मग ३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक (४६) धावा करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले होते. पण सूर्या आणि रिंकू या जोडीने सर्वकाही बदलून टाकले. खरे तर श्रीलंका सहज सामना जिंकेल असे वाटत असताना भारतीय गोलंदाजांनी सामन्यात रंगत आणली. एकोणिसाव्या षटकात रिंकू सिंगने कमाल करत अवघ्या तीन धावा देऊन दोन बळी घेतले. भारताकडून रिंकू सिंग, रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाने प्रत्येकी २-२ बळी घेतले. यात भर पडली अन् अखेरच्या षटकात सूर्याने दोन बळी घेतले.
दरम्यान, टीम इंडियाने मालिका सहज जिंकली असली तरी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसाठी ट्वेंटी-२० मालिका काही खास गेली नाही. दुसऱ्या सामन्यात शुबमन गिलच्या जागी संधी मिळाल्यानंतर तो एकही धाव न काढता तंबूत परतला. तेव्हा त्याचा त्रिफळा उडाला. अखेरच्या सामन्यातही तो चार चेंडू खेळूनही खाते उघडू शकला नाही आणि चामिंदू विक्रमासिंघेचा शिकार झाला. दुसऱ्या डावात संजू यष्टीरक्षक म्हणून आपले योगदान देत होता. पण, सोपा झेल आणि चुका त्याची पाठ सोडत नव्हत्या. संजू पुन्हा एकदा शून्यावर बाद झाल्याने त्याची चाहत्यांनी चांगलीच फिरकी घेतली.
तत्पुर्वी, शुबमन गिल वगळता एकाही भारतीय शिलेदाराला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ३७ चेंडूत ३९ धावांची संयमी खेळी केली. अखेर भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १३७ धावा करू शकला. अखेरच्या काही षटकांमध्ये रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी साजेशी खेळी केल्याने सर्वबाद होण्याचा धोका मात्र टळला. भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक (३९) धावा केल्या, तर यशस्वी जैस्वाल (१०), संजू सॅमसन (०), रिंकू सिंग (१), सूर्यकुमार यादव (८), शिवम दुबे (१३), रियान पराग (१६), वॉशिंग्टन सुंदर (२५), रवी बिश्नोई (नाबाद ८) आणि मोहम्मद सिराज शून्यावर धावबाद झाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करताना महेश तीक्ष्णाने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर वानिंदू हसरंगा (२), चामिंदू विक्रमासिंघे, असिथा फर्नांडो आणि रमेश मेडिंस यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, खलील अहमद, मोहम्मद सिराज.