SL vs IND 3rd T20 Match Live Updates : सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात यजमान श्रीलंकेने चांगली कामगिरी केली. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाला अवघ्या १३७ धावांत रोखण्यात त्यांना यश आले. संजू सॅमसन आजही खाते न उघडता तंबूत परतला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत भारतीय फलंदाजांना कोंडीत पकडले. शुबमन गिल वगळता एकाही भारतीय शिलेदाराला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ३७ चेंडूत ३९ धावांची संयमी खेळी केली. अखेर भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १३७ धावा करू शकला. अखेरच्या काही षटकांमध्ये रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी साजेशी खेळी केल्याने सर्वबाद होण्याचा धोका मात्र टळला.
भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक (३९) धावा केल्या, तर यशस्वी जैस्वाल (१०), संजू सॅमसन (०), रिंकू सिंग (१), सूर्यकुमार यादव (८), शिवम दुबे (१३), रियान पराग (१६), वॉशिंग्टन सुंदर (२५), रवी बिश्नोई (नाबाद ८) आणि मोहम्मद सिराज शून्यावर धावबाद झाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करताना महेश तीक्ष्णाने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर वानिंदू हसरंगा (२), चामिंदू विक्रमासिंघे, असिथा फर्नांडो आणि रमेश मेडिंस यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आज संघात चार बदल केले असून, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर शुबमन गिलचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबेला संधी मिळाली. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी केवळ सराव असाच आहे. यजमान श्रीलंकेसाठी मात्र अस्तित्वाची लढाई आहे.
भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, खलील अहमद, मोहम्मद सिराज.