SL vs IND Series : भारत आणि श्रीलंका यांच्यात होत असलेल्या ट्वेंटी-२० मालिकेकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. २७ तारखेपासून या मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्हीही संघ आपल्या नवनिर्वाचित प्रशिक्षकाच्या नेतृत्वात खेळत आहे. गौतम गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक आहे, तर श्रीलंकेच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सनथ जयसूर्याकडे आहे. भारताला पराभूत करण्यासाठी जयसूर्याने रणनीती आखल्याचे दिसते. आयपीएलमध्ये संजू सॅमसनचा जवळचा सहकारी असलेल्या शिलेदाराला जयसूर्याने संघासोबत जोडले आहे. श्रीलंकेच्या अंतरिम प्रशिक्षकाने खुलासा केला की, राजस्थान रॉयल्सचार शिलेदार झुबिन भरुचाने ट्वेंटी-२० मालिकेच्या तयारीसाठी आमच्या फलंदाजांना मदत केली.
श्रीलंकेच्या संघ व्यवस्थापनाने भारताचा माजी खेळाडू झुबिन भरुचाला आणले आणि सहा दिवस श्रीलंकेच्या फलंदाजांना त्याने मार्गदर्शन केले. याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, असे जयसूर्याने सांगितले. लंका प्रीमिअर लीगचा हंगाम संपल्याने इतरही खेळाडू यजमान संघासोबत जोडले आहेत. भरूचाच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानच्या संघाने प्रभावी कामगिरी केली होती. संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग हे राजस्थानच्या संघातील शिलेदार भारतीय संघाचा भाग आहेत. तसेच भारतीय संघाच्या वन डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली आहे. याचाच फायदा श्रीलंकन संघाने घ्यायला हवा. ते जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी आहेत, असे जयसूर्याने नमूद केले.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.
दरम्यान, २७ जुलैपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिली परीक्षा असेल.