GAutam gambhir news : क्रिकेटपटू, राजकारणी, मार्गदर्शक आणि आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर कार्यरत आहे. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून तो नवीन सुरुवात करत आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्याने गंभीरवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गंभीरचा तापट स्वभाव, आक्रमकपणा आणि खेळाप्रती असलेले प्रेम भारतीय क्रिकेटला फायदेशीर ठरेल असे अनेकांनी म्हटले. अनेक आजी माजी खेळाडूंनी बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत करताना गौतम गंभीरला शुभेच्छा दिल्या. मात्र, नेहमीप्रमाणे पाकिस्तानी खेळाडूंना यामुळे मिरची झोंबली.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पण, भारतीय संघ पाकिस्तानच्या धरतीवर जाणार नसल्याचे कळते. यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये संघर्ष होत आहे. यावर दोन्हीही देशातील माजी खेळाडू व्यक्त होत आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमदने हा मुद्दा तापलेला असताना गंभीरच्या निवडीवरून संताप व्यक्त केला.
पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमद वारंवार क्रिकेट विश्वातील घडामोडींवर बोलत असतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह बीसीसीआयवर बोलून तो सर्वांचे लक्ष वेधत असतो. अनेकदा त्याने चाहत्यांना केवळ आकर्षित करण्याच्या हेतूने हास्यास्पद विधाने केली आहेत. आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत गंभीरबद्दल प्रतिक्रिया दिली. व्हीव्हीएस लक्ष्मणला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवायला हवे होते. कारण त्याने भारत ब संघासोबत खूप काम केले आहे आणि या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यामुळे मला वाटते की, गौतम गंभीरला केवळ ओळखीमुळे हे पद मिळाले असावे.
दरम्यान, २७ जुलैपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिली परीक्षा असेल.