Press Conference BCCI : श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले. हार्दिक पांड्याची फिटनेसची समस्या असल्याने त्याला वगळून सूर्यकुमार यादवला ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २७ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळेल. ही मालिका नाना कारणांनी खास आहे. ट्वेंटी-२० मालिकेनंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. (gautam Gambhir On Virat Kohli and Rohit Sharma)
दरम्यान, गौतम गंभीरनेविराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीचे कौतुक करताना एक सूचक विधान केले. विराट-रोहितच्या भवितव्याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, विराट आणि रोहित यांनी मोठ्या व्यासपीठावर नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. मग ट्वेंटी-२० विश्वचषक असो की मग वन डे विश्वचषक. एक गोष्ट मी स्पष्ट करतो की, त्यांना अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका... यामध्ये रोहित-विराटची संघाला खूप गरज असेल. ते इतर सहकारी खेळाडूंना प्रेरणा देतील यात शंका नाही. त्यांचा फिटनेस चांगला असेल आणि त्यांना वाटत असेल तर ते नक्कीच २०२७ च्या विश्वचषकात खेळू शकतात.
यावेळी आगरकरने सूर्याला कर्णधार बनवल्याचे कारण सांगताना हार्दिकच्या फिटनेसबद्दल भाष्य केले. अजित आगरकर म्हणाला की, सूर्यकुमार यादव कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार असल्याने त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तो ट्वेंटी-२० मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. सर्व फॉरमॅट खेळू शकेल असा कर्णधार असावा असे सर्वांनाच वाटते. हार्दिक पांड्याच्या फिटनेसच्या समस्यामुळे त्याला वगळण्यात आले.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संघ -
वन डे - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
ट्वेंटी-२० - सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
Web Title: sl vs ind series Gautam Gambhir press conference he says Rohit sharma and virat Kohli will play the 2027 World Cup, if they want
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.