SL vs IND T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळेल. २७ तारखेपासून टीम इंडिया श्रीलंकेच्या धरतीवर मालिका खेळेल. यानंतर वन डे मालिका होणार आहे. बीसीसीआयने या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली असून, सूर्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला वगळून सूर्या कर्णधार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात शुबमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले. नव्या इनिंगसाठी सूर्यकुमारला सर्वजण शुभेच्छा देत आहेत. आता त्याची पत्नी देविशा शेट्टीने आपल्या पतीला शुभेच्छा देताना काही बाबींवर आवर्जुन प्रकाश टाकला. (suryakumar yadav and devisha shetty)
देविशा शेट्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली की, सूर्याने भारतासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी कल्पनाही केली नव्हती की तो कर्णधार बनेल. पण, देव खूप महान असून, तो प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ योग्य त्या वेळेत देत असतो. आज मला खूप अभिमान वाटत आहे. भारतीय क्रिकेटची चालत आलेली परंपरा पुढे नेण्यात सूर्या यशस्वी ठरेल.
दरम्यान, सूर्यकुमार यादवने १४ मार्च २०२१ रोजी इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातून भारताच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले. २७ जुलैपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिली परीक्षा असेल.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.