Join us  

Gautam Gambhir च्या 'टीम'मध्ये कोण कोण? वाचा Team India च्या 'हेड'ची सर्व उत्तरं

Gautam Gambhir press conference : प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी विविध बांबीवर भाष्य केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:14 PM

Open in App

Gautam Gambhir Press Conference : भारतीय संघाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरने श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. प्रशिक्षक म्हणून गंभीरने प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर देखील होता. आगामी मालिकेबद्दल बोलताना त्यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. हार्दिक पांड्याची फिटनेसची समस्या असल्याने त्याला वगळून सूर्यकुमार यादवला ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची इच्छा असल्यास ते नक्कीच २०२७ चा विश्वचषक खेळू शकतात, असे गौतम गंभीरने सांगितले. 

७ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळेल. ही मालिका नाना कारणांनी खास आहे. ट्वेंटी-२० मालिकेनंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. (gautam Gambhir On Virat Kohli and Rohit Sharma)  गौतम गंभीरने सांगितले की, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी ट्वेंटी-२० मधून निवृत्ती घेतल्याने संघात काही बदल करावे लागले. सूर्यकुमार यादव वन डे संघाचा भाग नाही, तो केवळ ट्वेंटी-२० मध्ये खेळताना दिसेल. तसेच भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेनंतर एक महिना आहे, तेव्हा सपोर्ट स्टाफबद्दल स्पष्ट माहिती देऊ असे गंभीरने नमूद केले. अभिषेक नायर आणि रियान टेन डोइशेसोबत मी काम केले आहे. त्यामुळे एका महिन्यात याबद्दल निर्णय होईल, असे गंभीरने स्पष्ट केले. 

रोहित-विराट २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार?

दरम्यान, गौतम गंभीरनेविराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीचे कौतुक करताना एक सूचक विधान केले. विराट-रोहितच्या भवितव्याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, विराट आणि रोहित यांनी मोठ्या व्यासपीठावर नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. मग ट्वेंटी-२० विश्वचषक असो की मग वन डे विश्वचषक. एक गोष्ट मी स्पष्ट करतो की, त्यांना अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका... यामध्ये रोहित-विराटची संघाला खूप गरज असेल. ते इतर सहकारी खेळाडूंना प्रेरणा देतील यात शंका नाही. त्यांचा फिटनेस चांगला असेल आणि त्यांना वाटत असेल तर ते नक्कीच २०२७ च्या विश्वचषकात खेळू शकतात. 

विराट कोहलीबद्दलच्या प्रश्नावर व्यक्त होताना गंभीरने संतप्त प्रतिक्रिया दिली. त्याचा रोख नेटकऱ्यांवर असल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली आणि माझे खूप चांगले संबंध होते. पण, केवळ टीआरपीसाठी काहीही चालवले गेले. मी प्रशिक्षक झाल्यानंतर विराटसोबत चर्चा केली. माझे त्याच्याशी खूप चांगले संबंध होते, आम्ही समजूतदार आहोत. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे. आम्ही दोघे आमच्या संघासाठी सामने जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करू, असे गौतम गंभीरने म्हटले. 

प्रशिक्षक गंभीरला अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबद्दल प्रश्न केला असता तो म्हणाला की, संघातून वगळलेल्या प्रत्येकाला खेळाडूला वाईट वाटणे हे साहजिकच आहे. रिंकू सिंगकडे पाहा त्याने ट्वेंटी-२० विश्वचषकापूर्वी खरोखरच खूप चांगली कामगिरी केली. पण, त्यालाही संधी मिळाली नाही. आम्ही केवळ १५ खेळाडूंची निवड करू शकतो. 

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संघ -वन डे रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा. ट्वेंटी-२० - सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध श्रीलंकाअजित आगरकर