SL vs IND T20 Series : शनिवारपासून भारतीय क्रिकेटच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे. नवनिर्वाचित कर्णधार आणि नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षकाच्या नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. रोहित शर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतल्याने सूर्यकुमार यादववर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाला मार्गदर्शन करेल. रोहितच्या नेतृत्वात शिकलेल्या सूर्याने आपला गुरू हिटमॅनबद्दल बोलताना त्याचे तोंडभरून कौतुक केले. याशिवाय रोहित मैदानात एक लीडर असतो असे आवर्जुन सांगितले.
भारतीय संघाचे नेतृत्व करावे हे प्रत्येक खेळाडूप्रमाणे माझेही स्वप्न होते. आपल्या संघासाठी काहीतरी चांगले करता यावे म्हणून सर्वजण झटत असतात. हळूहळू तुम्ही विचार करू लागता की, कशाप्रकारे टीम इंडियाच्या विजयात योगदान देता येईल. मग आणखी एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे जर तुम्ही कर्णधार झाला तर? मी रोहित शर्माकडून खूप काही शिकलो आहे. तो नेहमीच एका लीडरप्रमाणे (जमिनीवरच्या नेत्यासारखा) असतो. मला वाटते की, कर्णधार आणि लीडरमध्ये खूप फरक असतो. एकजण त्यांच्या गटासोबत (संघासोबत) उभा राहतो आणि दुसरा त्यांना मार्गदर्शन करतो. ट्वेंटी-२० क्रिकेट कसे खेळायचे आणि सामने कसे जिंकायचे हे मी रोहितकडून शिकलो आहे. त्यामुळे तोच ट्रॅक सुरू राहणार आहे. फक्त इंजिन बदलले आहे, बाकीचे डब्बे अजूनही तसेच आहेत, असे सूर्यकुमार यादवने सलामीच्या सामन्यापूर्वी सांगितले.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.