ind vs sl t20 squad : भारतीय संघाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरने हार्दिक पांड्याला वगळून सूर्यकुमार यादवला ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवले. टीम इंडिया येत्या २७ तारखेपासून श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० आणि त्यानंतर वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी गुरुवारी बीसीसीआयने आपला संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादवला ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याचे डिमोशन झाले. याचाच दाखला देत भारताचा माजी खेळाडू बीसीसीआयवर संतापला.
हार्दिक पांड्याने आयपीएलच्या दोन हंगामात गुजरात टायटन्सच्या संघाची धुरा सांभाळली. या संघाच्या पदार्पणाच्या हंगामात त्याने गुजरातला किताब जिंकवून दिला. त्याने ट्वेंटी-२० विश्वचषकात उपकर्णधारपदाची जबाबदारी चोखपणे पार पाडली. पण, आता भारताला नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. त्यामुळे नवीन सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. गौतम गंभीरची काही वेगळी रणनीती असावी. सूर्यकुमार यादव हा एक अप्रतिम खेळाडू आहे. ट्वेंटी-२० मध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज असलेला सूर्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यात यशस्वी ठरेल याची खात्री आहे. पण, मला हार्दिक पांड्यासाठी खूप वाईट वाटते, असे भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने म्हटले.
IANS शी बोलताना कैफने सांगितले की, गौतम गंभीर हा एक उत्तम कर्णधार आणि प्रशिक्षक आहे. त्याला क्रिकेटबद्दल खूप माहिती आहे. मात्र, हार्दिक पांड्याने कोणतीही चुकीची गोष्ट केली नव्हती. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढायला नको हवे होते. त्याने १६ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताची कमान सांभाळली असून, तो एक अनुभवी कर्णधार आहे.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.