ruturaj gaikwad and shubman gill : श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या ट्वेंटी-२० आणि वन डे संघाची घोषणा झाली आहे. येत्या २७ तारखेपासून टीम इंडिया श्रीलंकेच्या धरतीवर मालिका खेळेल. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ असेल. आगामी मालिकांसाठी बीसीसीआयने गुरुवारी आपल्या संघाची घोषणा केली. वरिष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनासह काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. पण, ऋतुराज गायकवाडला एकाही संघात स्थान नसल्याने चाहत्यांनी रोष व्यक्त केला. मागील सात ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ऋतुराजच्या नावाची नोंद आहे.
दरम्यान, भारतीय संघाचे माजी निवडकर्ते कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी ऋतुराजची बाजू मांडताना बीसीसीआयवर टीका केली. ते म्हणाले की, शुबमन गिल ट्वेंटी-२० क्रिकेटसाठी पात्र नाही. त्याला उपकर्णधार का बनवण्यात आले हे मला समजत नाही. ऋतुराज गायकवाडची ट्वेंटी-२० मध्ये आपोआप जागा बनते. तो ट्वेंटी-२० साठी पात्र आहेच पण गिलसारखे त्याचे नशीब नसल्याने डावलले जाते. हे खूप चुकीचे आहे. मला वाटते की, ऋतुराज आगामी काळात धावा करून निवडकर्त्यांना प्रत्युत्तर देईल. कृष्णम्माचारी त्यांच्या युट्यूब चॅनलवर बोलत होते.
ऋतुराजने त्याच्या शेवटच्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ३५६ धावा केल्या आहेत. या यादीत यशस्वी जैस्वाल (२६३ धावा) दुसऱ्या, शुबमन गिल (२०१ धावा) तिसऱ्या, कर्णधार सूर्यकुमार यादव (१९७ धावा) चौथ्या आणि हार्दिक पांड्या १५८ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष बाब म्हणजे श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी अभिषेक शर्मालाही संधी मिळाली नाही. अभिषेक आणि ऋतुराज ही जोडी झिम्बाब्बे दौऱ्यावर चांगल्या लयमध्ये दिसली होती.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.