ruturaj gaikwad vs shubman gill : श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा संघ जाहीर केला अन् क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली. ती म्हणजे ऋतुराज गायकवाड... मागील काही कालावधीपासून सातत्याने चमकदार कामगिरी करूनही मराठमोळ्या खेळाडूला वगळल्याने चाहते रोष व्यक्त करत आहेत. अलीकडेच भारताची युवा ब्रिगेड ट्वेंटी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली होती. यावेळी ऋतुराजला मालिकेतील अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, पहिल्या काही सामन्यांमध्ये अप्रतिम खेळी करून ऋतुराजने संघाच्या विजयात योगदान दिले. शुबमन गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियाने नवख्या झिम्बाब्वेविरूद्ध ४-१ असा विजय साकारला.
खरे तर मागील सात ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऋतुराजने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. मात्र असे असूनही त्याला श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून वगळल्याने चाहत्यांनी बीसीसीआयला लक्ष्य केले. ऋतुराजने त्याच्या शेवटच्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ३५६ धावा केल्या आहेत. या यादीत यशस्वी जैस्वाल (२६३ धावा) दुसऱ्या, शुबमन गिल (२०१ धावा) तिसऱ्या, कर्णधार सूर्यकुमार यादव (१९७ धावा) चौथ्या आणि हार्दिक पांड्या १५८ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष बाब म्हणजे श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी अभिषेक शर्मालाही संधी मिळाली नाही. अभिषेक आणि ऋतुराज ही जोडी झिम्बाब्बे दौऱ्यावर चांगल्या लयमध्ये दिसली होती.
दरम्यान, नवनिर्वाचित कर्णधार सूर्यकुमार यादवची संघात एन्ट्री झाल्याने ऋतुराजला वगळण्यात आले असल्याचे सांगितले जाते. पण, संघर्ष करत असलेल्या गिलला दोन्हीही मालिकांमध्ये उपकर्णधारपदाची संधी मिळाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही माजी खेळाडूंनी ऋतुराजसाठी आवाज उठवला. तर चाहत्यांनी ऋतुराज विरूद्ध शुबमन असा ट्रेन्ड चालवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर ऋतुराज गिलला वरचढ आहे.
ट्वेंटी-२० मध्ये कोण वरचढऋतुराज गायकवाड शुबमन गिल
- सामने - २३ १९
- धावा - ६२३ ५०५
- सर्वोत्तम धावसंख्या - १२३ नाबाद, १२६ नाबाद
- ४ अर्धशतके/ १ शतक, ३ अर्धशतके/१ शतक
- स्ट्राईक रेट १४३, ५४ - १३९.५०
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.