गुवाहाटी-
श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटीत खेळवल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघानं पहिली फलंदाजी करत ३७३ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाकडून विराट कोहलीनं शतकी खेळी साकारली. तर गोलंदाजीत भारतीय संघाचा वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मलिकनं आपल्या वेगवान गोलंदाजीचा याआधीचा रेकॉर्ड मोडीत काढला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज म्हणून उमरान मलिकच्या नावाची नोंद झाली आहे. उमराननं श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात १४ व्या षटकात वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करत फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. १४ व्या षटकाचा पहिला चेंडू उमराननं तब्बल १४७ किमी प्रतितास वेगानं टाकला. तर दुसरा चेंडू १५१ किमी प्रतितास वेग इतका होता. पण या षटकातील चौथ्या चेंडूच्या वेगानं त्याचा आजवरचा रेकॉर्ड मोडीत निघाला.
उमराननं १४ व्या षटकातील चौथा चेंडू तब्बल १५६ किमी प्रतितास इतक्या वेगानं टाकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजानं टाकलेला आजवरचा हा सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड उमरानच्याच नावावर होता. श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० सीरिजमध्ये त्यानं १५५ किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकला होता.
विराट कोहलीनं ठोकलं खणखणीत शतक
विराट कोहलीनं या सामन्यात नाबाद शतकी खेळी साकारून वर्षाची सुरुवात गोड केली आहे. कोहलीनं ८० चेंडूत शतक पूर्ण केलं. या शतकासह विराटनं भारतीय भूमीत वनडे सामन्यांत सर्वाधिक शतकांमध्ये सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. वनडेत भारतीय भूमीत कोहलीचं हे विसावं शतक ठरलं आहे. तसंच श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम कोहलीनं आपल्या नावावर केला आहे. कोहलीचं श्रीलंकेविरुद्धचं हे ९ वं शतक ठरलं. सचिन तेंडुलकरच्या नावावर श्रीलंकेविरोधात ८ शतकं जमा होती.
Web Title: Sl Vs Ind Umran Malik Became Fastest Indian Bowler In International Cricket Know This Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.