नवी दिल्ली : नामिबियाच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर इतिहास रचला आहे. आजपासून सुरू झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेत नामिबियाच्या संघाने श्रीलंकेला ५५ धावांनी पराभूत केले. नामिबिया सारख्या नवख्या संघाने मोठा विजय मिळवल्याने क्रिकेट वर्तुळात त्यांच्या संघाची चर्चा रंगली आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हा देखील नामिबियाच्या खेळीने प्रभावित झाला आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकासाठी नामिबियानेही धमाकेदार सुरुवात केली. त्यांनी आशियाई चॅम्पियन श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली.
या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, नामिबियाने श्रीलंकेला १६४ धावांचे आव्हान दिले होते. ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला अपयश आले. श्रीलंकेचा संघ २० षटकांत सर्वबाद केवळ १०८ धावा करू शकला. या सामन्यात नामिबियाच्या फलंदाजांपेक्षा संघाच्या गोलंदाजांचे कौतुक केले जात आहे कारण श्रीलंकेसारख्या संघाला १०८ धावांवर सर्वबाद करणे ही मोठी कामगिरी आहे. मैदानावर या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले जात असले तरी सध्या एका हिरोची खूपच चर्चा रंगली आहे.
मॉर्नी मॉर्केल ठरला नामिबियाच्या विजयाचा हिरो
नामिबियाच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करणारा मोर्नी मॉर्केल या विजयाचा खरा हिरो ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात नामिबियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना घाम फोडला. मॉर्केलने ड्रेसिंग रूममधून सूत्र हालवली आणि गोलंदाजांना मार्गदर्शन केले. खरं तर दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्नी मॉर्केल हा नामिबिया क्रिकेट संघाचा गोलंदाजी सल्लागार आहे. मॉर्केलने दक्षिण आफ्रिकेसाठी ११७ एकदिवसीय, ८६ कसोटी आणि ४४ टी-२० सामने खेळले आहेत. तसेच तो जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मॉर्केलने कॉमेंट्रीही केली आहे. त्याने २०२१ मध्ये बीबीएलमध्ये ब्रिस्बेन हीटकडून शेवटचा सामना खेळला होता. याच मॉर्केलच्या अनुभवाचा फायदा नामिबियाच्या संघाला झाल्याचे बोलले जात आहे. आज श्रीलंकेसारख्या संघाला पराभूत करण्याचे श्रेय मॉर्नी मॉर्केलला दिले जात आहे.
मॉर्केल बंधूच्या खांद्यावर संघाची धुरा
मॉर्नी मॉर्केलचा भाऊ आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ॲल्बी मॉर्केल हा देखील नामिबिया क्रिकेट संघाच्या कोचिंग युनिटमध्ये सामील झाला आहे आणि तो संघाचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. या दोन भावांनी नामिबियाच्या संघाच्या विकासाठी निर्णायक भूमिका बजावली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: SL vs NAM match Namibia beat Sri Lanka thanks to the efforts of Morne Morkel, the bowling consultant of the Namibian team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.