sl vs nz live । नवी दिल्ली : श्रीलंकेने यजमान न्यूझीलंडला मालिकेतील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभवाची धूळ चारून विजयी सलामी दिली आहे. वन डे मालिकेत झालेल्या पराभवानंतर आशियाई किंग्ज श्रीलंकेने शानदार पुनरागमन करत किवी संघाला पराभवाचा धक्का दिला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९६ धावा केल्या. श्रीलंकेकडून चरिथ असलंका (६७) आणि कुसर परेराने (५३) नाबाद खेळी करून यजमान संघाला तगडे आव्हान दिले.
तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. किवी संघाकडून जिमी नीशमला (२) तर ॲडम मिल्ने आणि लिस्टरल यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला. पाहुण्या संघाने दिलेल्या १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने शानदार सुरूवात केली. डेरी मिचेल (६६) आणि मार्क चॅपमॅन (३३) यांच्या स्फोटक खेळीमुळे न्यूझीलंडच्या संघाने विजयाकडे कूच केली. मात्र, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करून सामन्यात पुनरागमन केले. श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाका, वानिंदु हसरंगा आणि प्रमोद मधुशन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने १६ चेंडूत २७ धावांची खेळी केली मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले.
अखेर न्यूझीलंडचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १९६ धावा करू शकला. दोन्ही संघाची धावसंख्या बरोबरीत असल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मिळालेल्या संधीचा फायदा घेत श्रीलंकेने शानदार कामगिरी केली आणि सुपर ओव्हरमध्ये विजय साकारला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला. श्रीलंकेकडून महेश तीक्क्षणा षटक टाकण्यासाठी सज्ज होता. तीक्क्षणाने आपल्या षटकांत केवळ ८ धावा देत २ बळी पटकावले. सुपर ओव्हरमध्ये लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेसमोर ६ चेंडूत ९ धावा करण्याचे आव्हान होते. ॲडम मिल्नेच्या पहिल्याच २ चेंडूवर श्रीलंकन सलामीवीरांनी प्रहार करून सामना आपल्या नावावर केला. २ चेंडूत १० धावा करून चरिथ असलंकाने यजमान संघाला पराभवाची धूळ चारली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"