Tim Southee Catch Video, SL vs NZ 1st Test: बांगलादेश आणि भारत यांच्यात सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात यजमान भारत वरचढ चढताना दिसत आहे. दुसरीकडे श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात मात्र काँटे की टक्कर सुरू आहे. २ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ३ दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून सामना बरोबरीत आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ३०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४० धावा केल्या. दुसऱ्या डावात श्रीलंकेने दमदार कमबॅक करत ४ बाद २३७ धावा केल्या. याच डावातील एका कॅचने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे ३५ वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने स्लिपमध्ये हवेत झेप घेत हा कॅच पकडला. त्यामुळे या कॅचचे विशेष कौतुक केले जात आहे.
श्रीलंकेने तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव ३४० धावांवर संपवला. न्यूझीलंडला पहिल्या डावाअखेरीस ३५ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावासाठी मैदानात आला. पहिली दोन षटके श्रीलंकन सलामीवीरांनी संयमाने खेळून काढली. पण तिसऱ्या षटकात त्यांना पहिला झटका बसला. पाथुम निसांका चांगल्या लयीत होता, पण स्विंग गोलंदाजी खेळता न आल्याने बॅटची कड लागून चेंडू स्लिपमध्ये गेला. दुसऱ्या स्लिपच्या बाजूने चेंडू वेगाने जाणार इतक्यात ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत झेप घेतली आणि वेगाने जाणारा चेंडू झेलून निसांकाला परतीचा रस्ता दाखवला. पाहा अफलातून झेलचा व्हिडीओ-
दरम्यान, त्यानंतर श्रीलंकेचा दुसरा सलामीवीर दिमुथ करूणरत्ने याने ८३ धावांची दमदार खेळी केली. अनुभवी दिनेश चंडीमलने ६१ धावांची इनिंग खेळली. तर अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजय डि सिल्वा दोघेही वैयक्तिक ३४ धावांवर नाबाद आहेत. या सामन्यातील दोन दिवसांचा खेळ शिल्लक असून श्रीलंकेच्या सहा विकेट्स आणि न्यूझीलंडचा दुसरा डाव राहिलेला आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.