SL vs NZ 2nd Test : सध्या श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. आज दुसऱ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी यजमानांनी चांगली सुरुवात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना साजेशी कामगिरी करण्यात श्रीलंकेला यश आले. कामिंदू मेंडिसने पुन्हा एकदा चमक दाखवून शतकाला गवसणी घातली. त्याच्याशिवाय पथुम निसांका (२७), दिनेश चंदिमल (३०), अँजेलो मॅथ्यूज (३६) आणि कुसल मेंडिसने (५०) धावांचे योगदान दिले. २५ वर्षीय कामिंदू मेंडिस मागील काही कालावधीपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
कामिंदू मेंडिसने त्याच्या सातव्या कसोटीत चौथ्यांदा शतक झळकावले आहे. मेंडिसने न्यूझीलंडविरुद्ध गॉले कसोटीत शतक झळकावून पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधले. या डावखुऱ्या फलंदाजाने प्रथमच अव्वल ५ मध्ये फलंदाजी केली आणि त्याने संकटात सापडलेल्या संघाला तर सांभाळलेच शिवाय चौथ्यांदा शतक झळकावण्याची किमया साधली. त्याने त्याच्या ११ कसोटी डावांमध्ये चौथ्यांदा शतकी खेळी केली.
खरे तर मेंडिसने कसोटी पदार्पण केल्यापासून प्रत्येक सामन्यात शतक किंवा अर्धशतक झळकावले आहे. मेंडिसने २०२२ मध्ये गॉले येथून त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली आणि पहिल्याच सामन्यात ६१ धावा केल्या. यानंतर त्याला २०२४ मध्ये कसोटी खेळण्याची संधी मिळाली आणि या युवा खेळाडूने बांगलादेशविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली. चितगाव कसोटीतही त्याने नाबाद ९२ धावांची खेळी केली होती. याशिवाय त्याने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीत ११३ धावांची अप्रतिम खेळी खेळली होती. लॉर्ड्स कसोटीत त्याच्या बॅटमधून ७४ धावा आल्या. पुन्हा त्याने ओव्हल कसोटीत ६४ धावांचे योगदान दिले आणि आता गॉले कसोटीत शतक झळकावले. मेंडिसने बांगलादेश, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध कसोटी शतके झळकावली आहेत.