SL vs NZ 2nd Test Match : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही शतकी खेळी करुन श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसने आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. क्रिकेट विश्वाला प्रभावित करणाऱ्या मेंडिसने आठ सामन्यांमध्ये पाच शतके झळकावण्याची किमया साधली. याशिवाय चालू वर्षात सर्वाधिक कसोटी शतके (५) झळकावणाऱ्यांच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर पोहोचला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जो रूट (४), तिसऱ्या क्रमांकावर ओली पोप (३), चौथ्या स्थानी शुबमन गिल (३) आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन ३ शतकांसह पाचव्या स्थानावर आहे. विशेष बाब म्हणजे कामिंदू मेंडिसने १३ डावांमध्ये नऊवेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये पाच शतकी खेळींचा समावेश आहे.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॉले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून यजमान श्रीलंकेने विजयी सलामी दिली. त्यामुळे दुसरा सामना पाहुण्या न्यूझीलंडसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चुरशीच्या या लढतीत आताच्या घडीला श्रीलंका आघाडीवर असल्याचे दिसते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने १३२.२ षटकांपर्यंत ५ बाद ४३४ धावा केल्या. दिनेश चंदिमल आणि कामिंदू मेंडिस यांच्या शतकी खेळीने किवी संघाची डोकेदुखी वाढवली. याशिवाय अँजेलो मॅथ्यूजने ८८ धावांचे योगदान दिले. मेंडिसने आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध दोन, इंग्लंडविरुद्ध एक आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन अशी एकूण पाच शतके ठोकली आहेत.
दरम्यान, मेंडिसने कसोटी पदार्पण केल्यापासून प्रत्येक सामन्यात शतक किंवा अर्धशतक झळकावले आहे. मेंडिसने २०२२ मध्ये गॉले येथून त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली आणि पहिल्याच सामन्यात ६१ धावा केल्या. यानंतर त्याला २०२४ मध्ये कसोटी खेळण्याची संधी मिळाली आणि या युवा खेळाडूने बांगलादेशविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली. चितगाव कसोटीतही त्याने नाबाद ९२ धावांची खेळी केली होती. याशिवाय त्याने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर कसोटीत ११३ धावांची अप्रतिम खेळी खेळली होती. लॉर्ड्स कसोटीत त्याच्या बॅटमधून ७४ धावा आल्या. पुन्हा त्याने ओव्हल कसोटीत ६४ धावांचे योगदान दिले आणि आता गॉले कसोटीत शतक झळकावले. मेंडिसने बांगलादेश, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध कसोटी शतके झळकावली आहेत.