श्रीलंकेच्या संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार विजयाची नोंद केली. फॉलोऑनची नामुष्की ओढावलेल्या न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात ३६० धावांतच आटोपला. श्रीलंकेच्या संघाने हा सामना एक डाव आणि १५४ धावांनी जिंकत सामना एक दिवस आधीच संपवला. याआधीचा पहिला सामनाही गाले स्टेडियमवरच खेळवण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ६३ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या सामन्यातील विजयासह त्यांनी पाहुण्या संघाला क्लीन स्वीप दिली आहे.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात चौघांची अर्धशतकी खेळी, पण...
पहिल्या डावात अवघ्या ८८ धावांत आटोपल्या किवींनी दुसऱ्या डावात चांगला खेळ केला. पण श्रीलंकेनं उभारलेल्या डोंगराऐवढ्या धावसंख्येपुढे ही कामगिरी खूपच शुल्लक ठरली. दुसऱ्या डावात न्यूझींलंडच्या ताफ्यातून ड्वेन कॉन्वे ६१(६२), टॉम ब्लंडल ६०(६४), ग्लेन फिलिफ्स ७८(९९) आणि मिचेल सँटनर ६७(११५) या चौघांनी अर्धशतकी खेळी केली. पण एकालाही अर्धशतकी खेळीच रुपांतर शतकी खेळीत करता आले नाही. परिणामी संघाचा दुसरा डाव ३६० धावांवर आटोपला
आधी सुट्टी दिली होती आता घेतली
पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे या सामन्याचा निकाल हा सहाव्या दिवशी लागला होता. पहिल्या कसोटी सामन्यात सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर आता पाहुण्या संघाचा खेळ चौथ्या दिवशीच खल्लास करत श्रीलंकेच्या गड्यांनी चला आणखी एक सुट्टी घेऊ अशा अंदाजात विजय मिळवल्याचे दिसून येते.
श्रीलंकेच्या विजयातील हिरो
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून निशान पेरिस (Nishan Peiris) याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय प्रभात जयसूर्या याने ३ आणि कर्णधार धनंजया डिसिल्वा याला एक विकेट मिळाली. पहिल्या डावात १८५ धावांच्या नाबाद खेळीसह अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कामिंदू मेंडिस हा सामनावीर तर न्यूझीलंडला पहिल्या डावात ८८ धावांत गुडघे टेकायला लावणारा जयसूर्याला मालिकावीर ठरला.