श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दोन सामन्यांची ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी महत्त्वाची असेल. खरे तर या मालिकेतील सलामीचा सामना सहा दिवस खेळवला जाईल. साधारणपणे एक कसोटी सामना पाच दिवसांचा असतो. पण, श्रीलंकेतील गॉल येथे मालिकेदरम्यान निवडणूक असल्याने पहिला कसोटी सामना सहा दिवसांचा असेल. एकूणच एक रेस्ट डे असणार आहे. श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असल्याने २१ सप्टेंबर रोजी खेळ होणार नाही.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना १८ सप्टेंबरपासून खेळवला जाईल. मागील दोन दशकात प्रथमच श्रीलंकेचा संघ सहा दिवसांचा कसोटी सामना खेळत आहे. २००१ मध्ये शेवटच्या वेळी कोलंबो येथे झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात श्रीलंकेने सहा दिवसांची कसोटी खेळली होती. तेव्हा पोया दिवस साजरा करण्यासाठी एक दिवस खेळ थांबवण्यात आला होता. कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या वेळी २००८ मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात रेस्ट डे घोषित करण्यात आला होता. तेव्हाही निवडणुकीमुळे सहा दिवसांचा कसोटी सामना झाला.
न्यूझीलंडने शेवटच्या वेळी २०१९ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली होती. श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, तर न्यूझीलंड पाच सप्टेंबरपासून ग्रेटर नोएडा येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी तयारी करत आहे. श्रीलंकेचा संघ २८ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-२० सामन्यांसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे.