SL vs PAK 1st Test : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानी चाहत्यांकडून अम्पायरच्या निर्णयावर कांगावा केला जात आहे. दुसऱ्या डावात 342 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीर इमाम-उल-हक ( Imam-ul-Haq wicket controversy ) याला बाद दिल्यावरून हा सर्व वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानी चाहते अम्पायरवर टीका करत आहेतच, पण ते श्रीलंकेचा यष्टिरक्षक निरोशान डिकवेला ( Niroshan Dickwella) याच्या उत्तम कामगिरीवर आक्षेप घेताना दिसत आहेत.
श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 222 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची अवस्थान दयनीय झाली होती, परंतु कर्णधार बाबर आजमने शतकी खेळी करून संघाला 218 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर श्रीलंकेला दुसऱ्या डावातही फार चांगली कामगिरी करता आली नाही. ओशादा फर्नांडो ( 64) व कुसल मेंडिस ( 76) यांनी लंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मोहम्मद नवाज व यासिर शाह यांनी धक्के दिले. दिनेश चंडिमलने एकाकी झुंज दिली आणि त्याच्या नाबाद 94 धावांच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 337 धावा करून पाकिस्तानसमोर विजयासाठी 342 धावांचे लक्ष्य ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर इमाम-उल-हक व अब्दुल्लाह शफिक यांनी पहिल्या विकेटसाटी 87 धावांची मजबूत भागीदारी केली. इमाम-उल-हक 73 चेंडूंत 35 धावांवर स्टम्पिंग झाला आणि त्याची हिच विकेट वादात अडकली. रमेश मेंडिसने टाकलेला चेंडूचा अंदाज घेण्यास इमाम चुकला अन् यष्टिंमागून डिकवेलाने चपळाईने बेल्स उडवून त्याला स्टम्पिंग केले. तिसऱ्या अम्पायरने बराच वेळ रिप्ले पाहिल्यानंतर इमामला बाद दिले. डिकवेलाने जेव्हा बेल्स उडवल्या तेव्हा इमामचा पाच किंचितसा हवेत दिसतोय, तरीही पाकिस्तानी चाहते खवळले आहेत.