Babar Azam, Sri Lanka vs Pakistan 2nd Test : पहिल्या कसोटीत विक्रमी धावांचा पाठलाग करून मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या पाकिस्तान संघाला दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने जमिनीवर आणले. ५०८ धावांचे अशक्य लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेऊन यजमानांनी निम्मी लढाई आधीच जिकंली. त्यानंतर प्रभात जयसूर्या ( Prabath Jayasuriya ) व रमेश मेंडिस ( Ramesh Mendis) या फिरकीपटूंनी मिळून ९ विकेट्स घेत श्रीलंकेला जबरदस्त पुनरागमन करून दिले. श्रीलंकेने २४६ धावांनी हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर यजमान श्रीलंकेने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेने ३७८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात त्यांनी पाकिस्ताचा पहिला डाव २३१ धावांवर गुंडाळला. रमेश मेंडीसने ४७ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर प्रभात जयसूर्याने ३ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने दुसर्या डावात धनंजया डी सिल्वाचे ( १०९) शतक अन् कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या ६१ धावांच्या जोरावर ८ बाद ३६० धावांवर डाव घोषित केला. रमेश मेंडिसने ५४ चेंडूंत ४५ धावांची खेळी केली. श्रीलंकेने विजयासाठी ५०८ धावांचे लक्ष्य ठेवले.
अब्दुल्लाह शफिक ( १६) या डावात अपयशी ठरला. इमान-उल-हक व कर्णधार बाबर आजमने पाकिस्तानचा डाव सावरला. पण, इमामला ४९ धावांवर माघारी जावे लागले. मोहम्मद रिझवान ( ३७) बाद झाल्यानंतर पाकिस्तानची गाडी घसरली. कर्णधार बाबर एकाकी खिंड लढवत होता. त्याने १४६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ८१ धावा करताना सामना ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला होता. पण, जयसूर्याने त्याला पायचीत केले. यासिर शाहच्या २७ धावा वगळल्या तर तळाचा एकही फलंदाज जयसूर्याच्या फिरकीसमोर टिकला नाही. तिसरीच कसोटी खेळणाऱ्या जससूर्याने चौथ्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.