Sri Lanka vs West Indies Test : यजमान श्रीलंकेनं पहिल्या कसोटी सामन्यात मजबूत पकड घेताना दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ५ बाद २९७ धावा केल्या आहेत. कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या १४७ धावा आणि पथूम निसंका व धनंजया डी सिल्वा यांच्या अर्धशतकांनी वेस्ट इंडिजच्या अडचणी वाढवल्या. पण, या सामन्यात धनंजया ज्या पद्धतीनं बाद झाला त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शॅनोन गॅब्रियलच्या गोलंदाजीवर धनंजयानं स्वतःची विकेट वाचवण्यासाठी तीन वेळा चेंडू बॅटीनं मारला, पण एवढे प्रयत्न करूनही तो विकेट वाचवू शकला नाही. चेंडूनं नव्हे तर त्यानं स्वतःच विकेट फेकली...
प्रथम फलंदाजी करताना निसंका व करुणारत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी १३९ धावा जोडल्या. निसंका ५६ धावांवर गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रोस्टन चेसनं श्रीलंकेला दोन धक्के देताना ओशादा फर्नांडो ( ३) व अँजेलो मॅथ्यूज ( ३) यांना माघारी पाठवून वेस्ट इंडिजला कमबॅक करून दिले. पण, यावेळी करुणारत्नेला धनंजयानं चांगली साथ दिली आणि श्रीलंकेला मोठ्या धावांच्या दिशेनं वाटचाल करून दिली. धनंजया ६१ धावांवर बाद झाला, पण त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीनं सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला.
गॅब्रिएलनं टाकलेला चेंडू धनंजयाच्या बॅटीची किनार घेत यष्टिंच्या दिशेनं जात होता, तो अडवण्यासाठी धनंजयानं दोन वेळा बॅटीनं चेंडूला फटका मारला. चेंडू यष्टिंपासून दूर राहिला, परंतु या प्रयत्नात धनंजयानं बॅट यष्टिंवर मारली आणि तो हिटविकेट होऊन माघारी परतला. त्याच्यापाठोपाठ करुणारत्ने १४७ धावांवर बाद झाला.
पाहा व्हिडीओ.