कोलंबो : श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली. चहापानापर्यंत न्यूझीलंडचे पाच फलंदाज 179 धावांत माघारी परतले होते. रॉस टेलर ( 70) आणि हेन्री निकोल्स ( 42) यांनी संघाचा डाव सावरला. पण या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला भोपळाही फोडता आला नाही. तब्बत चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटच्या पहिल्या डावात केन शून्यावर माघारी परतला. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी त्यानं कसोटीत द्विशतकी खेळी साकरली होती.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या किवींनी 26 व्या षटकापर्यंत एकही विकेट गमावली नव्हती. जीत रावळ ( 33) आणि टॉम लॅथम ( 30) यांनी किवींना साजेशी सुरुवात करून दिली होती. पण, अकिला धनंजयाने सामन्याला कलाटणी दिली. त्यानं सामन्याच्या 27व्या षटकात रावळ व विलियम्सनला माघारी पाठवले आणि 31 व्या षटकात रावळलाही बाद केले. त्यामुळे त्यांची अवस्था 3 बाद 71 अशी झाली होती.
3 बाद 71 अशा अवस्थेनंतर टेलर आणि निकोल्स यांनी शतकी भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. त्यांची ही भागीदारी धनंजयाने संपुष्टात आणली. त्याने निकोल्सला पायचीत केले. निकोल्सने 78 चेंडूंत 2 चौकारांसह 42 धावा केल्या. त्यानंतर आलेला बीजे वॉटलिंगनही अवघ्या एका धावेवर पायचीत झाला. धनंजयाने 18.2 षटकांत 50 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. टेलर मात्र 106 चेंडूंचा सामना करत 4 चौकारांसह 70 धावांवर खेळत आहे.