नवी दिल्ली : भारताची सिनियर वेगवान गोलंदाज शिखा पांडे महिला क्रिकेटला अधिक लोकप्रिय करण्यासाठी छोटा चेंडू व लहान खेळपट्टी यासारखे सल्ले अनावश्यक मानते. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नियमांसोबत छेडखानी करू नका, असे आवाहन शिखाने आयसीसीला केले आहे.
झुलन गोस्वामीनंतर नव्या चेंडूने मारा करणारी भारताची सर्वांत चांगल्या महिला गोलंदाजांपैकी एक शिखाने न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन व भारताची उदयोन्मुख स्टार जेमिमा रोड्रिग्ज यांच्या उपस्थितीत आयसीसीच्या अलीकडेच झालेल्या वेबिनारबाबत अनेक टिष्ट्वट केले. याच वेबिनारदरम्यान अनेक प्रकारच्या सूचना करण्यात आल्या होत्या. भारतीय वायुसेनेची अधिकारी ३१ वर्षीय शिखाने लिहिले की,‘महिला क्रिकेटची प्रगती आणि महिला क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या सूचनांबाबत वाचले व ऐक त आहे. यातील जास्तीत जास्त सूचना अनावश्यक आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.’
सीमारेषा लहान करण्यासही शिखाचा विरोध आहे. ती म्हणाली,‘कृपा करून सीमारेषा लहान करू नका. अलीकडच्या कालावधीत आम्ही आपल्या पॉवर हिटिंगच्या जोरावर सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ही केवळ सुरुवात आहे. आम्ही निश्चितच यापेक्षा वरची पातळी गाठू. खेळाची चांगल्याप्रकारे मार्केटिंग करीत प्रगती करता येईल. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची गरज नाही. जगात कुठेही खेळल्या जाणाऱ्या लढतीचे थेट प्रसारण का केल्या जात नाही, असा सवालही शिखाने उपस्थित केला. शिखा म्हणाली, ‘महिला व पुुरुष क्रिकेटची तुलना व्हायला नको.महिला वेगवान धावपटू ८० मीटरच धावतात का?भारतातर्फे १०४ आंतरराष्ट्रीय सामन्यात ११३ बळी घेणाºया शिखाने हलका चेंडू व लहान खेळपट्टीची तुलना १०० मीटर दौडीसोबत करताना मुद्दा स्पष्ट केला. ती म्हणाली,‘आॅलिम्पिकमध्ये १०० मीटरमध्ये महिला धावपटू पदक पटकाविण्यासाठी आणि पुरुषांच्या वेळेची बरोबरी साधण्यासाठी ८० मीटर धावत नाही. त्यामुळे कुठल्याही कारणासाठी खेळपट्टीची लांबी कमी करणे संयुक्तिक वाटत नाही. ’