चेन्नई, दि. 12 - भारत दौ-यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्याच सराव सामन्यात दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय अध्यक्षीय संघासमोर विजयासाठी 348 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. डेव्हीड वॉर्नर (64), कर्णधार स्मिथ (55), टीएम हेड (65), मार्कस स्टोइनिस (76), मॅथ्यू वेड (45) यांनी अध्यक्षीय संघाची गोलंदाजी फोडून काढली.
भारताकडून कुशांग पटेल, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अवेश खान, कुलवंत खेज्रोलिया आणि अक्षय कर्नेवार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. कुशांग पटेल आणि कर्नेवार महागडे गोलंदाज ठरले. दोघांच्या सहा षटकात अनुक्रमे 58 आणि 59 धावा चोपून काढल्या.
भारत दौ-यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा भारतीय अध्यक्षीय संघाविरुद्ध पहिला सराव सामना आहे. चेन्नईच्या स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघाला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटबरोबर जुळवून घेता यावे यासाठी जास्तीत जास्त 50 षटकांचा खेळ होणार आहे.
सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (64) आणि कर्णधार स्मिथने (55) अर्धशतके झळकवली. वॉर्नरला (64) धावांवर कुशांग पटेलने श्रीवत्स गोस्वामीकरवी झेलबाद केले. त्यानंतर स्मिथला (55) धावांवर वॉशिंग्टन सुंदरने गुरकीरतसिंगकरवी झेलबाद केले. कार्टराइट भोपळाही न फोडता माघारी परतला. अवेश खानने त्याला बाद केले. मॅक्सवेलला (14) धावांवर सुंदरने बाद केले.
ऑस्ट्रेलियन संघाच्या तुलनेत भारतीय अध्यक्षीय संघ कमकुवत आहे. एकदिवसी़य क्रिकेटमधील विद्यमान विश्वविजेता संघ फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. फिरकीपटूंना अनुकूल परिस्थितीसोबत जुळवून घेणे आमच्यासाठी आव्हान असल्याचे स्मिथने कबूल केले आहे.
आॅस्ट्रेलियाला ज्या खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे त्यात केवळ गुरकिरत मान यालाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव आहे. त्याने २०१६ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन-डे सामने खेळले होते. त्यानंतर त्याला संघात पुनरागमन करता आले नाही. भारताचे जास्तीत जास्त खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत व्यस्त आहेत. त्यामुळे निवड समितीने सराव सामन्यासाठी निवडलेल्या संघात जास्तीत जास्त अनोखळी खेळाडू आहेत, पण त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे.
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर त्यांचे संघाचे दोन मुख्य फलंदाज आहेत. वॉर्नरने बांगलादेशविरुद्ध दोन शतकी खेळी केल्या. स्मिथला अनुभवी अॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल आणि अन्य खेळाडूंकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आॅस्ट्रेलिया संघात अनेक अष्टपैलू खेळाडू असून त्यात जेम्स फॉकनर, मार्कस् स्टोनिस, नॅथन कुल्टर नाईल आदींचा समावेश आहे. या सर्वांना आयपीएलमध्ये सहभागी होत असल्यामुळे भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे.