सिडनी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड करणे, हे स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना चांगलेच महागात पडले आहेत. आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर बीसीसीआयनेही त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. पण त्यांना ही शिक्षा लगेचच भोगावी लागू होऊ शकते का, तर नाही. कारण या दोघांना आपल्याला दिलेल्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या सात दिवसांत स्मिथ आणि वॉर्नर आपल्या शिक्षेविरोधात कधी अपील करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णयही घेतला आहे. त्याचबरोबर हे काळे कृत्य करणाऱ्या कॅमेरुन बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालती आहे. आयसीसीने स्मिथवर एका सामन्याची बंदी घातली आहे, तर सामन्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे. बीसीसीआयने स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनाही आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
या सर्व शिक्षांचा विचार केला तर स्मिथ आणि वॉर्नर यांची कारकिर्द संपू शकते. त्यामुळे हे दोघेही या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी वकिलांची मदत घेणार आहे. सात दिवसांत जर या दोघांनी अपील केली तर त्यांची शिक्षा कमी करायची का, यावर विचार केला जाऊ शकतो. पण जर सात दिवसांमध्ये या दोघांनी अपील केले नाही, तर त्यांना या सर्व शिक्षा भोगाव्या लागणार आहेत.