नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड करत क्रिकेट या खेळाला काळीमा फासली आहे. या प्रकारामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला कर्णधारपदावरून डच्चू देण्यात येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा आयोगाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला कळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ याबाबत कधी निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर ही गोष्ट क्रिकेट या खेळाला काळीमा फासणारी आहे, असे म्हणत या गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेधही केला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा आयोगाला कडक कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा आयोगाचे अध्यक्ष जॉन विली आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत चर्चा केली आणि स्मिथची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यानंतर त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले आहे की, " ऑस्ट्रेलिया सरकारला ही गोष्ट खेळासाठी निंदनीय असल्याचे वाटले आहे. जेव्हा कोणताही खेळाडू देशाचे प्रतिनिधीत्व करत असतो, तेव्हा तो खेळभावनेनेच मैदानात उतरला पाहिजे. जो खेळाडू असे करणार नाही, त्याला कोणतीही क्षमा करण्यात येणार नाही, त्याच्यावर आम्ही नेहमीच कडक कारवाईच करू. त्यामुळे स्टीव्हन स्मिथची कर्णधारपदावरून उचलबांगडी करायला हवी, त्याचबरोबर यामध्ये सहभागी असलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांवरही कारवाई करायला हवी."
काय आहे प्रकरणकेप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनितीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.