मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कर्णधारपदी यावेळी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने 4, 7, 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत.
भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद मिताली राजकडून हरमनप्रीत कौरकडे आले होते. आता हरमनप्रीतनंतर भारताच्या कर्णधारपदाची धुरा स्मृतीकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी स्मृतीला एकदा संघाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. पण हा सामना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नव्हता.
असा आहे भारतीय संघ
वन डे मालिकेत इंग्लंडला नमवलेभारतीय महिला संघाने सोमवारी दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचे 162 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पार केले. मराठमोळी स्मृती मानधनाने ( 63) पुन्हा एकदा विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार मिताली राजने ( 47*) आणि पूनम राऊत (32) यांनीही उपयुक्त खेळी केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड महिला संघाला 161 धावांवरच समाधान मानावे लागले. पहिल्या वन डे सामन्यातील पराभवानंतर मालिकेत कमबॅक करण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील होता. मात्र, त्यांना संपूर्ण 50 षटकंही खेळता आली नाही. नॅटली स्किव्हर ( 85) हीने एकाकी झुंज दिली आणि त्यामुळे इंग्लंडला 161 धावांपर्यंत मजल मारता आली. झुलन गोस्वामी ( 4/30) आणि शिखा पांडे ( 4/18) या जलदगती गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी खिळखिळीत केली. त्यांना पूनम यादवने ( 2/28) चांगली साथ दिली. भारतीय जलदगती गोलंदाजांनी एकूण 8 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच, प्रथमच भारताच्या दोन गोलंदाजांनी एका सामन्यात प्रत्येकी चार विकेट्स घेत्या आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. त्यानंतर स्मृती मानधना व पूनम राऊत यांनी संघाला विजयासमीप आणले. पूनमने 65 चेंडूंत 4 चौकारांसह 32 धावा केल्या. स्मृतीने 74 चेंडूंत 63 धावा केल्या. त्यात 7 चौकार व 1 षटकार यांचा समावेश होता. स्मृतीचे हे 15 वे अर्धशतक ठरले. धावांचा पाठलाग करताना स्मृतीने 8 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. धावांचा पाठलाग करताना तिने 117.8च्या सरासरीनं 589 धावा चोपल्या आहेत.