नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत भारत आणि नेदरलॅंड्स यांच्यात सामना खेळवला गेला. मात्र भारताचा सामना सुरू असतानाच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुरुषांइतकेच वेतन मिळणार असल्याचे जय शाह यांनी जाहीर केले. खरं तर यापूर्वी न्यूझीलंडने तीन महिन्यांपूर्वी समान वेतन त्यांच्या महिला व पुरुष क्रिकेटपटूंसाठी जाहीर केले होते.
जय शाह यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, भेदभावाचा सामना करण्यासाठी BCCIने पहिले पाऊल टाकले आहे आणि त्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू करत आहोत. क्रिकेटमधील समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल."
महिला व पुरूष क्रिकेटपटूंना मिळणार समान वेतन
लक्षणीय बाब म्हणजे बीसीसीआयच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे महिला खेळाडूंना देखील पुरूष खेळाडूंप्रमाणे मॅच फी दिली जाईल. एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रूपये दिले जातील. समान वेतन ही आमच्या महिला क्रिकेटपटूंप्रती माझी बांधिलकी होती आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी सर्वोच्च परिषदेचे आभार मानतो. जय हिंद, असेही जय शाह यांनी म्हटले.
जय शाह यांनी ही मोठी घोषणा केल्यावर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आभार मानले आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. "महिला आणि पुरुषांसाठी वेतनाच्या समानतेच्या निर्णयामुळे भारतातील महिला क्रिकेटसाठी खरोखरच आनंदाचा दिवस आहे. बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार", अशा आशयाचे ट्विट करून हरमनप्रीत कौरने आभार मानले.
तर मराठमोळ्या स्मृती मानधनाने भारतातील महिला क्रिकेटसाठी किती आनंददायी बातमी आहे, असे ट्विट करून जय शाह यांच्या निर्णयावरून आनंद व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Smriti Mandhana and Harmanpreet Kaur thanked BCCI Secretary Jay Shah after he announced equal pay for women and men cricketers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.