Join us  

Smriti Mandhana create History! स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी; सचिन, रोहितच्या विक्रमाशी बरोबरी; मिताली राजला टाकले माघारी

भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मानधना हिने सलग दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 4:27 PM

Open in App

Smriti Mandhana create History! भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मानधना हिने सलग दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. स्मृतीने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावताना ऐतिहासिक कामगिरी केली. तिने सचिन तेंडुलकर, डेव्हिड वॉर्नर व रोहित शर्मा यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. INDWvsSAW यांच्यातला दुसरा वन डे सामना आज चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे आणि स्मृतीने खणखणीत शतक झळकावले आहे.

दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शफाली वर्मा २० धावा करून माघारी परतल्यानंतर आलेली दयालन हेमलथा ( २४) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. मात्र, स्मृती व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार देताना तिसऱ्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी केली. स्मृतीने मालिकेतील दुसरे शतक पूर्ण करून संघाला ४५.५ षटकांत ३ बाद २७१ धावांपर्यंत पोहोचवले आहे. स्मृतीने १२० चेंडूंत १८ चौकार व २ षटकारांसह १३६ धावा केल्या, तर हरमनप्रीत ६२ धावांवर खेळतेय.

स्मृतीचे हे आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सातवे शतक ठरले. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्या महिला क्रिकेटपटूंच्या यादीत तिने अव्वल स्थानी असलेल्या मिताली राजसोबत बरोबरी केली.  पण, मितालीला ७ शतकांसाठी २११ इनिंग्ज खेळाव्या लागल्या होत्या आणि स्मृतीने केवळ ८४ इनिंग्ज खेळल्या. हरमनप्रीत ११२ इनिंग्जमध्ये ५ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्मृतीने पहिल्या वन डे सामन्यात १२७ चेंडूंत ११७ धावा केल्या होत्या आणि आजच्या शतकानंतर ती वन डे क्रिकेटमधअये सलग दोन शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.  

 दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे हे तिचे तिसरे वन डे क्रिकेटमधील शतक ठरले आणि यासह तिने चार्लोट एडवर्ड व सारा टेलर यांच्याशी बरोबरी केली. टॅमी ब्यूमोंट ४ शतकांसह आघाडीवर आहे.  बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन शतक झळकावणारी स्मृती ही चौथी खेळाडू ठरली. सचिन तेंडुलकर, डेव्हिड वॉर्नर व रोहित शर्मा यांनी वन डे क्रिकेटमध्ये येथे प्रत्येकी २ शतकं झळकावली आहेत.

  

टॅग्स :स्मृती मानधनाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय महिला क्रिकेट संघ