Smriti Mandhana, RCB: महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) सुरू झाली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पुरूष संघ जी कामगिरी आयपीएलमध्ये अद्याप करू शकलेला नाही, ती कामगिरी महिला संघ करेल अशी आशा होती. ती कामगिरी म्हणजेच स्पर्धेचे विजेतेपद! पण महिला संघानेही घनघोर निराशा केली. पहिल्या हंगामात ते प्लेऑफपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे कर्णधार स्मृती मंधानाचा खराब फॉर्म आणि तिच्यावरील कर्णधारपदाचे दडपण. कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्हीमुळे तिला WPL मध्ये आपला ठसा उमटवताच आला नाही.
RCB मंगळवारी WPL चा साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळत आहे आणि या संघासमोर मुंबई इंडियन्स आहे. त्यांनी आतापर्यंत शानदार खेळ दाखवत प्लेऑफमध्ये स्थान पटकावले आहे. मात्र या शेवटच्या सामन्यातही मंधानाला तिच्या बॅटमधून मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे RCB ने तिच्यासाठी मोजलेली किंमत जणून फुकटच गेली असा चाहत्यांचा सूर दिसत आहे.
स्मृतीच्या नावावर एकही अर्धशतक नाही!
आजच्या म्हणजे शेवटच्या साखळी सामन्यात मंधानाने 24 धावा केल्या. यासाठी तिने 25 चेंडू खेळले आणि तीन चौकारांसह एक षटकार लगावला. T20 च्या बाबतीत हा डाव अतिशय संथ आहे. या मोसमात मंधानाच्या कामगिरीवर नजर टाकली तर, तिची सर्वोच्च धावसंख्या ३७ होती. ही तिने गेल्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध केली होती. संघाच्या पहिल्या सामन्यातही तिची बॅट चांगली चालली नाही त्यामुळे तिला मोठा डाव साकारता आला नाही. मंधानाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात 35 धावा केल्या होत्या. पण आजच्या सामन्यातील या लीगमधील आठ सामन्यांत तिने एकूण 125 धावा केल्या. या दरम्यान तिची सरासरी 17.85 इतकी होती. तिच्या बॅटमधून ८ सामन्यात एकूण 19 चौकार आणि दोन षटकार आले.
स्मृतीच्या एका रन साठी RCB ने मोजले लाखो रूपये...
RCB ने मंधानावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये कामी आले नाहीत. आरसीबीने मंधानासाठी ३.४० कोटी रुपये खर्च केले होते. यासह मंधाना WPL ची सर्वात महागडी खेळाडू ठरली होती. ती आरसीबीचे नशीब चमकवेल आणि विजेतेपद मिळवून देईल या आशेने आरसीबीने तिच्यावर पैसे खर्च केले होते, पण मंधाना फारशी कामगिरी करू शकली नाही. तिच्या १२५ धावांपैकी प्रत्येक धाव RCB ला तब्बल २.७२ लाखांना पडली.
कर्णधारपदाचं ओझं झेपलं नाही?
मंधानाची गणना सध्या महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. WPL पूर्वी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या ICC महिला T20 विश्वचषकात तिने शानदार फलंदाजी केली होती. आयर्लंडविरुद्ध 87 आणि इंग्लंडविरुद्ध 52 धावा केल्या होत्या. मात्र तिला महिला लीगमध्ये चांगला खेळ दाखवणं शक्य झालं नाही. याचं एक कारण कर्णधारपदाचं दडपण असू शकतं असं बोललं जात आहे. कर्णधारपदामुळे क्रिकेटमधील अनेक खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाहीत, असे साधारणपणे दिसून येते. कदाचित मंधानाच्या बाबतीतही तसेच घडले असावे, असा चाहत्यांचा सूर दिसून येत आहे.