The Hundred Draft : दी हंड्रेड २०२४ चा ड्राफ्ट जाहीर झाला आणि त्यात वेस्ट इंडिजचा स्टार निकोलस पूरन याला प्रथम करारबद्ध करण्यात आले. पहिल्या फेरीत त्याच्यासह चार विंडीजच्या खेळाडूंना प्रत्येकी १२५००० पाऊंड या सर्वाधिक रकमेत करारबद्ध केले गेले. नॉर्दन सुपरचार्जर्सने पूरनची निवड केली, तर लंडन स्पिरिटने आंद्रे रसेल व शिमरोन हेटमायर यांना संघात घेतले. रोव्हमन पॉवेल व किरॉन पोलार्ड हे दोन खेळाडू अनुक्रमे ट्रेंट रॉकेट्स व साऊदर्न ब्रेव्हकडून खेळतील.
पण, काही अव्वल खेळाडूंना या ड्राफ्टमध्ये निवडले गेले नाही. इंग्लंडचा जेसन रॉय व मार्क वूड यांना दी हंड्रेडमध्ये वाली मिळाला नाही. ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर व टीम डेव्हिड हेही अनसोल्ड राहिले. भारताच्या हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रीग्ज व दीप्ती शर्मा यांच्यासह डिएंड्रा डॉटीन व सुझी बॅट्स यांनाही कोणत्याही संघाने निवडलेले नाही. पाकिस्तानच्या बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनाही एकाह फ्रँचायझीने संघात घेण्यास रस दाखवला नाही. तेच पाकिस्तानचा नसीम शाह याला बर्मिंगहॅम फोएनिस्कने सर्वोच्चम रक्कमेत खरेदी केले. शाहिन आफ्रिदी वेल्श फायरकडून, तर इमाद वसीम ट्रेंट रॉकेट्सकडून खेळणार आहे.
नुकतीच महिला प्रीमिअर लीग २०२४ ( WPL) जिंकणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाला ब्रेव्ह संघाने तर रिचा घोषला फोएनिक्सने आपल्या ताफ्यात घेतले. भारताचे हे दोनच खेळाडू दी हंड्रेडमध्ये खेळणार आहेत. २३ जुलैपासून दी हंड्रेड लीगचे चौथे पर्व सुरू होणार आहे.