Smriti Mandhana SmashesFastest ODI Century : भारताची कार्यवाहू कर्णधार स्मृती मानधना हिने बुधवारी राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात धमाकेदार शतक झळकावले. या शतकी खेळीसह तिने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. स्मृती मानधना हिने अवघ्या ७० चेंडूत शतक पूर्ण केले. या कामगिरीसह भारतीय महिला संघाकडून सर्वात जलदग शतकी खेळीचा विक्रम आता स्मृती मानधनाच्या नावे झाला आहे. स्मृती मानधना हिने आयर्लंड विरुद्धच्या आपल्या वादळी खेळीत ८० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १३५ धावा काढल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नियमित कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या विक्रमाला लावला सुरुंग
स्मृती मानधना हिने ऑयर्लंड विरुद्धच्या जलद शतकी खेळीसह नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडित काढला आहे. हरमनप्रीत कौरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ८७ चेंडूत शतक झळकवल्याचा रेकॉर्ड आहे. भारतीय महिला संघाकडून सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत ती आता दुसऱ्या स्थानावर असून स्मृती मानधना अव्वलस्थानी विराजमान झालीये.
वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचलीये स्मृती
वनडेतील स्मृती मानधना हिचे १० वे शतक आहे. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत असलेल्या इंग्लंडच्या टॅमी ब्युमॉन्टच्या विक्रमाशीही तिने बरोबरी केलीये. या यादीत ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग १५ शतकांसह सर्वात टॉपला आहे. न्यूझीलंडची सुझी बेट्स १३ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर स्मृती मानधना आणि टॅमी ब्युमॉन्ट या दोघी संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतकी खेळी करणाऱ्या बॅटर्सचा रेकॉर्ड्स
- ७० - स्मृती मानधना विरुद्ध आयर्लंड , राजकोट, २०२५
- ८७ - हरमनप्रीत कौर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बंगळुरू, २०२४
- ९० - हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डर्बी, २०१७
- ९० - जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध आयर्लंड, राजकोट, २०२५
- ९८ - हरलीन देओल विरुद्ध वेस्ट इंडिज, बडोदा, २०२४
महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या बॅटर्सची यादी
- १५ - मेग लॅनिंग
- १३ - सुझी बेट्स
- १० - टॅमी ब्युमॉन्ट
- १० - स्मृती मानधन
- ९ - चामारी अट्टापट्टू
- ९ - चार्लोट एडवर्ड्स
- ९ - नॅट सायव्हर-ब्रंट