Smriti Mandhana, IND vs AUS: मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात 'टीम इंडिया'ने सुपर ओव्हरमध्ये शानदार विजय नोंदवला. टीम इंडियाच्या या विजयात सलामीवीर स्मृती मंधाना हिचे अप्रतिम योगदान होते. १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मंधानाने ४९ चेंडूत ७९ धावा फटकावल्या. तिने आपली खेळी ४ षटकार आणि ९ चौकारांनी सजवली. मंधानाने १६०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या धुवांधार खेळीदरम्यान स्मृतीने एक महत्त्वपूर्ण विक्रम केला. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये किंग कोहलीच्या नावावर हा विक्रम आहे. त्यामुळे आता महिलांच्या क्रिकेटमध्ये स्मृती हळूहळू 'क्वीन' होत असल्याची चाहत्यांची भावना आहे.
स्मृती मंधाना ही महिला टी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारी खेळाडू ठरली आहे. हा विक्रम पुरुष क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटला 'चेस किंग' म्हणजेच आव्हानाचा पाठलाग करण्यात तरबेज असं म्हटलं जाते. स्मृती मंधाना या बाबतीत महिला क्रिकेटमधील निष्णात खेळाडू असल्याने आता ती महिला क्रिकेटची 'क्वीन' झाली असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.
आव्हानाचा पाठलाग करताना स्मृतीचा धमाका
स्मृती मंधानाने T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठलाग करताना १२वे अर्धशतक झळकावले. महिला क्रिकेटमधील हा विश्वविक्रम आहे. मंधानाने वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरला मागे टाकले. तिच्या नावावर ११ अर्धशतके आहेत. स्मृती मंधानाला लक्ष्याचा पाठलाग करायला आवडते आणि तिने पाठलाग करताना ४५ डावांत १,२९१ धावा केल्या आहेत. या दरम्यान, तिची सरासरी ३५.८६ आहे. ही तिच्या कारकिर्दीच्या सरासरीपेक्षा जवळपास ८ धावांनी अधिक आहे. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाठलाग करताना तिने २० अर्धशतके झळकावली आहेत. तसेच तिने ४५ डावांत ७३.४४ च्या सरासरीने १,९८३ धावा केल्या आहेत.