Smriti Mandhana Harmanpreet Kaur, Women's World Cup, IND vs WI: भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना आणि अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर या दोघींनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना जोरदार चोप दिला. महिला वन डे विश्वचषक २०२२ स्पर्धेत सुरू असलेल्या सामन्यात स्मृती मानधनाने ११९ चेंडूत १२३ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने १०७ चेंडूत १०९ धावा कुटल्या. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा त्रिशतक गाठले. त्यासोबतच स्मृती-हरमनप्रीत जोडीनेही विक्रम आपल्या नावे केला.
प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी तुफान फटकेबाजी करत संघाला ३०० धावांचा पल्ला ओलांडून दिला. भारतीय महिला संघाने वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच त्रिशतकी मजल मारली. याशिवाय, स्मृती-हरमनप्रीत जोडीने १८४ धावांची दणदणीत भागीदारी केली. वर्ल्ड कपच्या इतिहासात ही भारताकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली.
तसेच कर्णधार मिताली राज हिच्या नावावरही एक विक्रम झाला. महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम तिने केला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ३० षटकांत ८ बाद ३१७ धावा केल्या. सलामीवीर यास्तिका भाटिया, मिताली राज आणि दीप्ती शर्मा या तिघी स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर स्मृती मानधनाने हरमनप्रीत कौरसोबत दमदार फलंदाजी केली. या दोघांनी मिळून संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. स्मृतीने १३ चौकार व २ षटकारांसह सर्वाधिक १२३ धावा केल्या. तर हरमनप्रीत कौरने १० चौकार व २ षटकारांसह १०९ धावांची खेळी केली.