हॅमिल्टन : सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या दणकेबाज कामगिरीच्या बळावर भारतीयमहिला संघाने आयसीसी वनडे विश्वचषकात शनिवारी वेस्ट इंडिजचा १५५ धावांनी पराभव करीत विजयी पथावर वाटचाल केली. या विजयामुळे आठ संघांच्या विश्वचषकात भारत अव्वल स्थानावर पोहोचला. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि द. आफ्रिकेचेदेखील प्रत्येकी चार गुण आहेत, मात्र भारत धावगतीत पुढे आहे.
भारताने स्पर्धेच्या इतिहासात सर्वोच्च खेळी करीत ८ बाद ३१७ धावा उभारल्या. नंतर वेस्ट इंडिजला १६२ धावात गुंडाळले.स्मृती मानधनाने पाचवे शतक ठोकताना १२३ चेंडूत १३ चौकार तसेच दोन षटकार लगावत ११९ धावा केल्या. हरमनप्रीत कौरने १०७ चेंडूंमध्ये १० चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर १०९ घावा केल्या. हरमनप्रीतचे हे चौथे तसेच २०१७ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावा फटकाविल्यापासूनचे पहिलेच शतक ठरले. स्मृती- हरमनप्रीत यांनी चौथ्या गड्यासाठी तब्बल १८४ धावांची भागीदारी केली. महिला विश्वचषकात भारताकडून कुठल्याही गड्यांसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली.
मितालीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताच ४९ धावांवर भारताला यास्तिका भाटियाच्या रूपात पहिला धक्का बसला. त्यानंतर लगेच ५८ आणि ८७ धावांवर भारताचा दुसरा आणि तिसरा गडी बाद झाला. मिताली पाच आणि दीप्ती शर्मा १५ धावा काढून बाद झाल्या. धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली.
दियांद्रा डॉटिन (६२) वगळता एकाही खेळाडूने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर बाद झाला. डॉटिन आणि मॅथ्यूज यांनी सुरुवातीला मैदानावर चांगले पाय रोवले होते. त्यानंतर मात्र इंडिजची कोणतीही जोडी खेळपट्टीवर तग धरू शकली नाही. वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने आज एक गडी बाद करताच विश्वचषकात तिचे सर्वाधिक ४० बळी झाले आहेत.
यापेक्षा मोठी अपेक्षा नव्हती : मिताली
आजच्या कामगिरीहून मोठी अपेक्षा करू शकत नव्हती. आजचा विजय बाद फेरी गाठणारा ठरला. फलंदाजी आणि गोलंदाजी फारच शिस्तबद्ध झाली. आजच्या सामन्याचे महत्त्व सर्वांनी मनावर घेतले होते. विंडीज दोन सामने जिंकून आमच्याविरुद्ध खेळणार असल्याचे लक्षात ठेवून प्रत्येकीने योगदान दिले. स्मृती आणि हरमन यांचे विशेष कौतुक. सामन्याची मानकरी ठरलेल्या स्मृती मानधना हिने हा सन्मान हरमनप्रीतसोबत शेअर करण्याचा निर्णय घेत खिलाडूवृत्तीचा परिचय दिला.