नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) आयसीसीने (ICC) मोठी भेट दिली आहे. स्मृती सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट टूर्नामेंट खेळत आहे. अलीकडेच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ताबडतोब फलंदाजी करून स्मृतीने आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते. मराठमोळ्या स्मृतीच्या या उल्लेखणीय कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतली आहे.
भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ही युवा सलामीवीर शेफाली वर्मासोबत आयसीसीच्या '100 टक्के क्रिकेट सुपरस्टार' यादीत सामील झाली आहे. आयसीसीने ट्विट करून याबाबत अधिकृत माहिती दिली. शेफाली वर्मा, इंग्लंडची सोफी ॲक्लेस्टोन, न्यूझीलंडची अमेलिया केर, वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड या महिला क्रिकेटपटूंचा '100 टक्के क्रिकेट सुपरस्टार' यादीत समावेश करण्यात आला आहे.
ताबडतोब फलंदाजीसाठी प्रसिद्ध ICC ने '100% क्रिकेट सुपरस्टार्स' या यादीत आणखी पाच खेळाडूंचा समावेश केला आहे. स्मृती मानधना (भारत), फातिमा सना (पाकिस्तान), ॲशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), सोफिया डंकले (इंग्लंड) आणि गॅबी लुईस (आयर) या पाच खेळाडूंची वर्णी लागली आहे. 26 वर्षीय मानधना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा वर्षे पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे.