नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला सलग दुसऱ्या वर्षी ICC महिला ट्वेंटी-20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. या यादीत एकूण 4 खेळाडूंचा समावेश आहे. भारताची स्मृती मानधना, पाकिस्तानची निदा दार, न्यूझीलंडची सोफी डेव्हाईन आणि ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा यांना हे नामांकन मिळाले आहे.
स्मृती मानधनाची 'यशस्वी झेप'भारतीय क्रिकेट संघाने 2022 या वर्षात शानदार कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले यामध्ये स्मृती मानधनाचा मोलाचा वाटा राहिला. खरं तर मानधनाने 2022 या वर्षात 23 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये 593 धावा केल्या आहेत. तिने मावळत्या वर्षात एकूण 5 अर्धशतके झळकावली. तसेच 25 चेंडूत 50 धावा करत सर्वाधिक वेगाने अर्धशतक करण्याचा विक्रम देखील स्मृतीने केला.
अलीकडेच भारतीय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेत जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी आणि आगामी ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषक 2023 साठी भारताच्या संघाची घोषणा केली. ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषक 2023ची सुरूवात 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. भारतीय संघ 12 फेब्रुवारीला केप टाऊनमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या स्पर्धेचा पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया ग्रुप 2 असून त्यांच्यासोबत इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड हे संघदेखील आहेत.
ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषक 2023 साठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैदिक राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.
राखीव खेळाडू - सभिनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"