नवी दिल्ली : आयसीसीने मंगळवारी महिला ट्वेंटी-20 क्रमवारीची यादी जाहीर केली. यामध्ये भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सलामीवीर स्मृती मानधना अव्वल तीनमध्ये कायम आहे, तर अष्टपैलू दीप्ती शर्माची घसरण झाली आहे. अलीकडेच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेत स्मृतीला काही खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र, तरीदेखील तिने आयसीसी क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे.
दीप्ती शर्माची झाली घसरण दरम्यान, ऑस्ट्रेलियाची जोडी ताहलिया मॅकग्रा आणि बेथ मूनी या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर 612 गुणांसह आपल्या स्थानावर कायम आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 21 धावा केल्यानंतर श्रीलंकेची चमारी अथापथु हिने भारतीय कर्णधाराची बरोबरी साधली आहे. दोन्हीही खेळाडूंनी टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. दुसरीकडे दीप्ती शर्माने तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात 1 बळी घेतल्यानंतरही तिची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेची फिरकी गोलंदाज नॉनकुलुलेक म्लाबा भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यानंतर केवळ 27 सामन्यांत 753 गुणांसह दुसरे स्थान गाठले आहे.
12 तारखेला भारत विरूद्ध पाकिस्तान रणसंग्राम महिला प्रीमियर लीगच्या लिलावाच्या एक दिवस आधी ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होणार आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी महिला प्रीमियर लीगचा लिलाव होणार आहे. ट्वेंटी-20 विश्वचषकात सहभागी झालेल्या सर्व कर्णधारांच्या पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, "लिलावापूर्वी आम्हाला एक महत्त्वाचा सामना खेळायचा आहे आणि आम्ही फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करत आहोत. विश्वचषक हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचा आहे. आमचे लक्ष्य आयसीसी ट्रॉफी हे आहे. या गोष्टी येतच राहतील आणि एक खेळाडू म्हणून तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे आणि तुम्ही स्वतःची काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे WPL लिलाव असूनही भारतीय संघाचे लक्ष पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यावर आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"