Smriti Mandhana RCB Loss, WPL 2022: मधील सर्वात वाईट कामगिरी करणारे दोन संघ आज एकमेकांशी भिडले. त्यात अखेर स्मृती मंधानाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला स्नेह राणाच्या गुजरात जायंट्सने पराभूत केले. दोन्हीही संघांनी सुरूवातीचे २ सामने गमावले होते. त्यामुळे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी होते. अखेर आज गुजरात जायंट्सने अखेर पहिला विजय नोंदवला आहे आणि गुणतालिकेत खातं उघडलं. गुजरातसाठी सलग दुसऱ्यांदा शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला आणि यावेळी मात्र बाजी त्यांच्याच हाती लागली. गुजरातने बेंगळुरूचा 11 धावांनी पराभव केला. RCBची ही पराभवाची हॅटट्रिक झाली.
ब्रेबॉर्न स्टेडियममधील बुधवारची संध्याकाळ गोलंदाजांसाठी वाईट होती. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी छोट्या बाऊंडरीजचा फायदा घेत सामन्यात 40 षटकात एकूण 391 धावा केल्या. या सामन्यात दोन्ही संघांनी आपली सर्वात मोठी धावसंख्या केली. बंगळुरू विरुद्धच्या तीन सामन्यांत दुसऱ्यांदा २०० हून अधिक धावा कुटण्यात आल्या.
डंकलीचा रेकॉर्ड, हरलीनची पॉवर!
गुजरातने पॉवरप्लेमध्येच स्फोटक फलंदाजी करत 6 षटकांत 1 गडी गमावून 64 धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर सोफिया डंकलेने विक्रमी खेळी खेळली. तिने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक केले. हे स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. तिने 28 चेंडूत 65 धावा (11 चौकार, 3 षटकार) ठोकल्या. डंकले व्यतिरिक्त, हरलीन देओलने देखील गुजरातसाठी दमदार खेळी खेळली आणि 45 चेंडूत 67 धावा केल्या, ही तिची डावातील सर्वोच्च धावसंख्या होती. इतर फलंदाजांनीही छोट्या पण वेगवान खेळी करत संघाला 201 धावांपर्यंत नेले. बंगळुरूकडून हिदर नाइट आणि श्रेयंका पाटील यांनी २-२ बळी घेतले.
RCB ची पराभवाची हॅटट्रिक
प्रत्युत्तरात बंगळुरूनेही वेगवान सुरुवात करत 5 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या मात्र कर्णधार स्मृती मंधना मोठी खेळी करू शकली नाही. अनुभवी किवी सलामीवीर सोफी डिव्हाईनने बंगळुरूसाठी आघाडी घेतली. 17व्या षटकात बाद होण्यापूर्वी डिव्हाईनने 45 चेंडूत 66 धावा (8 चौकार, 2 षटकार) ठोकल्या, तिने संघासाठी सर्वात मोठी धावसंख्या केली. एलिस पेरी आणि रिचा घोष यांनाही विशेष काही करता आले नाही, पण अखेरीस हीदर नाइटने (नाबाद 30 धावा, 11 चेंडू) स्फोटक फलंदाजी करून आशा पल्लवित केल्या होत्या. अखेरच्या षटकात बंगळुरूला 24 धावांची गरज होती पण श्रेयंका पाटीलने 2 चौकार मारले तरी केवळ 12 धावा झाल्या आणि डाव 190 धावांवर थांबला. गुजरातकडून अँश गार्डनरने ३ बळी टिपले.