भारतीय संघाची स्टार बॅटर स्मृती मानधना हिने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार खेळी करुन दाखवली. पण तिचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकलं. ९१ धावांवर बाद होताच ती सर्वकालीन अनलकी क्लबमध्ये सामील झाली आहे. नव्वदीच्या घरात सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या महिला बॅटरच्या यादीत ती वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरच्या पंक्तीत जाऊन बसलीये. चौथ्यांदा तिच्यावर ही नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले.
शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाल्यामुळे खास विक्रमाची संधीही हुकली
वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात स्मृती मानधनाला एक खास विक्रम नोंदवण्याची संधी होती. टॅमी ब्युमाँटनंतर वनडेमध्ये सलग दोन वेळा शतके झळकावणारी ती दुसरी महिला बॅटर ठरली असती. पण ९१ धावांवर बाद झाल्यामुळे खास विक्रमी डावही फसला. या वनडे सामन्याआधी स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सामन्यात शतक झळकावले होते.
विकेट वाचवण्याचा अखेरचा प्रयत्नही फसला
सातत्यपूर्ण कामगिरी करणारी स्मृती मानधना पॅडल स्विप शॉट मारण्याच्या नादात बाद झाली. तिचा प्रयत्न फसला अन् चेंडू पॅडवर आदळल्यावर ती यष्टिसमोर स्पॉट झाल्यानं मैदानातील पंचांनी तिला आउट दिले. आपली विकेट वाचवण्यासाठी स्मृती मानधनाने रिव्ह्यू घेतला, पण तो कौलही तिच्या बाजूनं लागला नाही. परिणामी तिला निराश होऊन पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला.
तिच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाची धमाकेदार सुरुवात
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात स्मृती मानधनाने १०२ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने ९१ धावांची धमाकेदार खेळी केली. तिने पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या प्रतिका रावलच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ११० धावा करून संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. भारतीय महिला संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात ३१४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ १०३ धावांत आटोपला. भारतीय संघाने दमदार विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
Web Title: Smriti Mandhana misses out on hundred in 1st ODI, enters all-time unlucky list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.