भारताची स्टार बॅटर स्मृती मानधना हिने विराट कोहलीसंदर्भात खास गोष्टी शेअर केल्या आहेत. स्मृती म्हणाली आहे की, ज्यावेळी विराट कोहलीच्या भेटीचा योग येतो, तो क्षण खास असतो. आमच्या दोघांमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा रंगते. स्टार क्रिकेटरकडून लाख मोलाचा सल्लाही मिळतो, असेही ती म्हणाली आहे.
विराट-स्मृती यांच्यात कमालीचे साम्य
कुणाच्या अपेक्षाचं ओझं घेऊन मैदानात उतरायचं नसते. टीमला तुमच्याकडून जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करायचा असतो, असा कानमंत्र विराट कोहलीकडून मिळाल्याचा किस्साही तिने शेअर केला. स्मृती मानधना आणि विराट कोहली यांच्यात कमालीचे साम्य आहे. सेम टू सेम १८ क्रमांकाच्या जर्सीसह मैदानात उतरणारे ही जोडी आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझी संघाचा भाग आहे. स्मृतीनं आपल्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला ट्रॉफीही जिंकून दिली आहे. दुसरीकडे विराट कोहली पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे.
स्मृतीचा आवडता क्रिकेटर आहे विराट!
स्टार स्पोर्ट्सवरील खास मुलाखतीमध्ये जतिन सप्रू याने स्मृती मानधनाला विराटसंदर्भातील काही खास प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले. स्मृतीला ज्यावेळी तुझा आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तिने क्षणाचाही विलंब न लावता विराट कोहलीचं नाव घेतलं.
त्यानंतर सप्रूनं स्टार क्रिकेटर विराट कोहलीसोबत भेटीचा योग येतो त्यावेळी कोणत्या गोष्टीवर मैफिल रंगते? असा प्रश्न विचारला. त्यावर स्मृती मानधना म्हणाली की, फलंदाजीसंदर्भातील अनेक गोष्टी मी विचारल्या आहेत. याशिवाय मानसिकतेसंदर्भातील प्रश्न विचारले आहेत.
अन् विराटच्या बोलण्यामुळं स्मृतीचा माइंडसेटच बदलला
विराट कोहलीकडून नेहमीच मोठ्या खेळीची अपेक्षा असते. या अपेक्षांच ओझं तो कसे पेलतो? असा प्रश्नही स्मृती मानधना हिने विराट कोहलीला विचारला होता. यावर विराट कोहलीनं जे उत्तर दिलं ते स्मृती मानधनाला कानमंत्र मिळाल्यासारखं होते. स्मतीच्या प्रश्नावर विराटच उत्तर असं होत की, मी अपेक्षा बाजूला ठेवून संघाची गरज काय ते पाहून खेळण्यावर फोकस करतो. विराट कोहलीची ही गोष्ट ऐकल्यावर माइंडसेट बदलला, ही गोष्टही स्मृती मानधानने बोलून दाखवलीये.