Join us  

INDW vs WIW, Tri-Series: तिरंगी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय; स्मृती-हरमनप्रीतची पुन्हा एकदा 'यशस्वी' खेळी

smriti mandhana: सध्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिरंगी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:14 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने सोमवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला पराभवाची धूळ चारली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 167 एवढी धावसंख्या उभारली होती. ज्याचा पाठलाग करताना विडींजच्या संघाला पूर्णपणे अपयश आले आणि भारतीय महिलांनी 56 धावांनी सामना आपल्या नावावर केला. लक्षणीय बाब म्हणजे या मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर यास्तिका भाटिया (18) धावा करून स्वस्तात माघारी परतली. नंतर मराठमोळ्या स्मृती मानधनाने डाव सावरला आणि 51 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी केली. हरलीन देओल (12) धावांवर बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौरने स्मृतीला साथ दिली. दोघीही अखेरपर्यंत नाबाद राहिल्या आणि विंडीजसमोर 168 धावांचे सन्मानजनक आव्हान ठेवले. हरमनप्रीत कौरने 35 चेंडूत 56 धावांची उल्लेखणीय नाबाद खेळी केली. स्मृती मानधनाने 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर कर्णधार हरमनप्रीतने 8 चौकार ठोकून प्रतिस्पर्धी संघासमोर धावांचा डोंगर उभारला. 

भारताचा सलग दुसरा विजय 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरूवात निराशाजनक झाली. शेमेन कॅम्पबेल (47) आणि हेली मॅथ्यूज नाबाद (34) यांच्याव्यतिरिक्त कोणत्याच खेळाडूला साजेशी खेळी करता आली नाही. संघाची धावसंख्या 25 असताना वेस्ट इंडिजचे 3 फलंदाज तंबूत परतले होते. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 2 बळी घेतले, तर राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादव यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर विडींजचे फलंदाज गारद झाले. अखेर वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 4 बाद केवळ 114 धावा करू शकला आणि भारतीय संघाने 56 धावांनी विजय मिळवला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजस्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयटी-20 क्रिकेट
Open in App