महिला आशिया चषक टी-२० स्पर्धेत भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मात करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारतानेपाकिस्तान महिला संघाचा सात विकेट राखून पराभव केला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी १०९ धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला १०८ धावांवर रोखले. यानंतर भारताने ३५ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पंधराव्या षटकात विजयाची नोंद केली.
शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामी जोडीने टीम इंडियाला १०९ धावांचा पाठलाग करताना ८५ धावांची सलामी भागीदारी करुन दिली. मात्र त्यानंतर ९.३ ओव्हरमध्ये ८५ धावांवर स्मृती मंधाना बाद झाली. स्मृतीने ४१ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. त्यानंतर शफाली वर्मा ४० धावांवर बाद झाली. शफालीने २९ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांसह ४० धावा केल्या. शफाली आणि स्मृती दोघींनी अर्धशतक करता आलं नाही. मात्र दोघींनी टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
तत्पूर्वी, पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने तीन चौकारांच्या मदतीने सर्वाधिक २५ धावांची खेळी केली. तर आलिया रियाझने (६), निदा दारने (८), तुबा हसनने (२२), सईदा अरुब शाहने (२) आणि फातिमा सना नाबाद २२ धावा केल्या. तर इरम जावेद, नशरा संधूने, सादिया इक्बालला आपले खातेही उघडता आले नाही. त्यामुळे पाकिस्तान संघाला १९.२ षटकात सर्वबाद १०८ धावा करता आल्या.भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर रेणुका, पूजा आणि श्रेयंकाला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.