sanjay godawat universty । कोल्हापूर : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने आपल्या खेळीच्या जोरावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात जागा केली आहे. अलीकडेच पार पडलेला महिला प्रीमिअर लीगचा (WPL 2023) पहिला हंगाम स्मृतीसाठी एका वाईट स्वप्नासारखा राहिला. उद्घाटनाच्या हंगामात स्मृतीसह तिचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) काही खास कामगिरी करता आली नाही. अशातच आता पुन्हा एकदा स्मृती चर्चेत आली आहे. खरं तर स्मृतीने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठामध्ये बी.कॉमच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला आहे.
दरम्यान, स्मृतीच्या प्रवेशाबाबतची माहिती घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली आहे. "स्मृती मानधनाने बी.कॉम प्रवेशासाठी संजय घोडावत विद्यापीठाची निवड केली हा आमच्यासाठी गौरव आहे", असे भोसले यांनी यावेळी म्हटले. तसेच तिच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही शक्य ती मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्मृतीच्या प्रवेशाचे स्वागत - घोडावतसंस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी स्मृतीच्या प्रवेशाचे स्वागत केले. तसेच आमचे विद्यापीठ नेहमीच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत असते. या आधी देखील 18 वर्षाखालील गटात लॉन टेनिस प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या ऐश्वर्या जाधवला प्रवेश देऊन आम्ही शक्य ती मदत केली होती, असे घोडावत यांनी अधिक सांगितले.
स्मृतीच्या एका रन साठी RCB ने मोजले लाखो रूपये महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामात आरसीबीच्या संघाचे नेतृत्व स्मृती मानधनाकडे होते. पण RCB ने मानधनावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये कामी आले नाहीत. आरसीबीने मानधनासाठी ३.४० कोटी रुपये खर्च केले होते. यासह स्मृती WPL ची सर्वात महागडी खेळाडू ठरली होती. ती आरसीबीचे नशीब चमकवेल आणि विजेतेपद मिळवून देईल या आशेने आरसीबीने तिच्यावर पैसे खर्च केले होते, पण मानधना फारशी कामगिरी करू शकली नाही. तिच्या १२५ धावांपैकी प्रत्येक धाव RCB ला तब्बल २.७२ लाखांना पडली आहे.
कर्णधारपदाचे ओझे झेपले नाही?स्मृती मानधनाची गणना सध्या महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. WPL पूर्वी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या ICC महिला ट्वेंटी-२० विश्वचषकात तिने शानदार फलंदाजी केली होती. आयर्लंडविरुद्ध ८७ आणि इंग्लंडविरुद्ध ५२ धावा केल्या होत्या. मात्र, तिला महिला लीगमध्ये चांगला खेळ दाखवणे शक्य झाले नाही. याचे एक कारण कर्णधारपदाचे दडपण असू शकते असे बोलले जात आहे. कर्णधारपदामुळे क्रिकेटमधील अनेक खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाहीत, असे साधारणपणे दिसून येते. कदाचित मंधानाच्या बाबतीतही तसेच घडले असावे, असा चाहत्यांचा सूर दिसून येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"