ICC Women's Player Rankings - भारतीय महिला संघाने दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात थरारक विजयाची नोंद केली. भारतीय महिलांनी कमाल करताना सुपर ओव्हरमध्ये ही मॅच जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या १/१८७ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ५/१८७ अशी टक्कर दिली. सुपर ओव्हर मध्ये भारताने २१ धावांचे लक्ष्य ठेवले आणि ऑस्ट्रेलियाला १६ धावा करता आल्या. भारताने हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. स्मृती मानधना ( Smriti Mandhana) ने निर्धारित २० षटकांत ७९ धावा आणि सुपर ओव्हरमध्ये १३ धावा करताना विजयात खूप मोठा वाटा उचलला. डी वाय पाटील स्टेडियमवर उपस्थित ४५०००+ प्रेक्षकांसमोर भारतीय महिलांनी दमदार कामगिरी केली आणि त्याचा फायदा आयसीसीच्या क्रमवारीत झालेला पाहायला मिळतोय...
ICC ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅक्ग्राथ ही महिलांमध्ये नंबर वन ट्वेंटी-२० फलंदाज ठरली आहे. तिने सहकारी बेथ मूनीला दुसऱ्या स्थानावर ढकलले. भारताची स्टार फलंदाज स्मृतीने तिसरे स्थान कायम राखले आणि कारकीर्दितील सर्वाधिक ७४१ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली. भारताच्या शेफाली वर्मानेही एक स्थान वर सरकताना ६५१ रेटींग पॉईंट्ससह सहावे स्थान पटकावले. जेमिमा रॉड्रीग्ज ६२४ रेटींग पॉईंट्ससह नवव्या स्थानावर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"