India vs South Africa, 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ७ विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळून मालिका २-१ अशी जिंकली. भारताने १९९२, १९९६, २००० आणि २०१०मध्ये आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका जिंकली होती आणि त्यानंतर १२ वर्षांनी वन डे मालिका जिंकली. या सामन्यात अचानक मैदानावर श्वान शिरल्याने खेळाडूंची तारांबळ उडाली. शिखर धवन, वॉशिंग्टन सुंदर श्वानाला मैदानाबाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसले. सुरक्षा कर्मचारींनीही मैदानावर धाव घेतली. या प्रसंगानंतर अनेकांना गुवाहाटी येथे मैदानावर आलेला साप आठवला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या क्विंटन डी कॉक ( ६), यानेमन मलान ( १५), रिझा हेंड्रीक्स ( ९), एडन मार्कराम ( ९), डेव्हिड मिलर ( ७) आणि अँडिले फेहलुकवायो ( ५) हे अपयशी ठरले. मोहम्मद सिराज ( २-१७), वॉशिंग्टन सुंदर ( २-१५), कुलदीप यादव ( ४-१८) व शाहबाज अहमद ( २-३२) यांनी उत्तम गोलंदाजी करताना आफ्रिकेला ९९ धावांवर गुंडाळले. हेनरिच क्लासेनने ४२ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३४ धावा. कुलदीपने सलग दोन चेंडूंत बीजॉर्न फॉर्च्युन ( १) व एनरिच नॉर्खिया ( ०) यांना बाद केले. लुंगी एनगिडीने भारतीय गोलंदाजाची हॅटट्रिक पूर्ण होऊ दिली नाही. यापूर्वी १९९९ मध्ये नैरोबी येथे झालेल्या वन डेत त्यांना ११७ धावा करता आल्या होत्या.
शिखर धवन ( ८), इशान किशन ( १०) हे लगेच माघारी परतले. शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांनी चांगला खेळ करताना भारताचा विजय पक्का केला. शुबमन ४९ धावांवर बाद झाला. भारताने १९.१ षटकांत ३ बाद १०५ धावा करून मोठा विजय मिळवला. श्रेयस २८ धावांवर नाबाद राहिला. भारताचा २०२२ कॅलेंडर वर्षातील हा ३८ वा विजय ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या ( २००३) विक्रमाशी भारताने बरोबरी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"