नवी दिल्ली : आयपीएल २०२२मध्ये दोन नवे संघ सहभागी होत असून, त्यापैकी अहमदाबाद संघाची मालकी सीव्हीसी कॅपिटल्सने ५ हजार ६२५ कोटीत खरेदी केली. लखनौ संघ आरपीएसजीने ७,०९० कोटीत खरेदी केला आहे. सीव्हीसी ग्रुपने विदेशात बेटिंग कंपनीत पैसे गुंतवले असल्याचे पुढे येताच सीव्हीसी ग्रुपची अहमदाबाद संघावरची मालकी धोक्यात आली. बोली प्रक्रिया पूर्ण होताच सीव्हीसी ग्रुपच्या विशिष्ट व्यवहारांवर आक्षेप घेतला जात आहे.
आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी ट्विट करून यासंदर्भात पहिला आक्षेप नोंदविला होता. यानंतर मीडिया वृत्तात बेटिंगसंबंधी व्यवहार उघड झाल्याने सीव्हीसीच्या अडचणी वाढल्या. दिवाळीनंतर बीसीसीआयच्या कायदेशीर पॅनलकडून ही सत्यता पडताळली जाईल. त्यानंतर कंपनीचे व्यवहार आक्षेपार्ह वाटल्यास त्यांची लिलाव प्रक्रिया रद्द केली जाऊ शकेल, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सीव्हीसी ग्रुपने लिलाव प्रक्रियेच्या वेळी ही बाब सांगितली नव्हती. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय सीव्हीसी ग्रुपची बोली नियमांवर बोट ठेवून नाकारू शकते. असे झाल्यास बोली लावणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीकडे अहमदाबादच्या आयपीएल टीमची मालकी जाऊ शकते. ही दुसरी कंपनी अर्थात अदानी ग्रुप समूह आहे! अदानी ग्रुपने ५ हजार १०० कोटींची बोली लावली होती. त्यामुळे ५२५ कोटींनी अदानी ग्रुप हा लिलाव जिंकू शकले नाहीत. मात्र, आता जर सीव्हीसी ग्रुपला बीसीसीआयने नाकारले, तर या संघाची मालकी अदानी ग्रुपकडे जाऊ शकते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स ही एक खासगी गुंतवणूक कंपनी आहे. त्यांनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.
या गुंतवणुकीचा काही भाग हा क्रिकेटवर बेटिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवला आहे. टिपिको या जर्मनीतल्या गॅम्बलिंग कंपनीमध्येदेखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.
Web Title: ... so Adani owns Ahmedabad team? CVC Group's relationship with betting company, legal side to be investigated by BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.